बुलडाणा : राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्रत्यक्ष मतदानावर प्रकाश टाकला असता, लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मतदानाचा टक्का पासष्टी पार जात नसल्याचे दिसून आले. या दोन्ही निवडणुकीतील मतदानापासून वंचित राहिलेल्या त्या ३५ टक्के मतदारांना केव्हा समजणार आपला हक्क? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे उदंड जाहली मतदान जागृती, परंतु मतदानाचा टक्का वाढेना, असे वास्तव समोर येत आहे. मतदान करणे, हा प्रत्येकाचा हक्क? आहे. तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे. मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहून नये, यासाठी निवडणूक विभागाकडून अनेक जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येतात. भारत निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. याचे औचित्य साधून भारत निवडणूक आयोग २०११ पासून दरवर्षी २५ जानेवारीला ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय मतदार दिनाचा देशपातळीवरील मुख्य कार्यक्रम भारत निवडणूक आयोग नवी दिल्ली येथे, तर राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करतात. या जनजागृतीपर कार्यक्रमानंतरही मतदार राजा जागृत झाला नसल्याचे चित्र गेल्या काही निवडणुकीतील मतदानावर नजर टाकली असता समोर येते. एप्रिल २०१९ मध्ये लोकसभा व त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये विधानसभेसाठी आणि आता ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले. यातील लोकसभा व विधानसभा या महत्त्वाच्या निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी ६५ टक्क्याच्या खालीच आहे.
लोकसभा..
१७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी बुलडाणा लोकसभा मतदारसंघात ६३.५३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बुलडाणा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच दहा लाख ९९ हजारापेक्षा अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एका दृष्टीने १७ व्या लोकसभेसाठीचा हा एक महत्त्वपूर्ण क्षण हाेता. २०१४ मध्ये ६१ टक्के मतदारांनी मतदान केले होते.
विधानसभा
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात २१ ऑक्टोबरला सुमारे ६४ टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात सहा लाख २३ हजार ७८६ पुरुष व पाच लाख ७८ हजार १३३ महिला असे मिळून १२ लाख एक हजार ९१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. २०१४ मध्ये ६६.४० टक्के मतदान झाले होते. परंतु यावेळी यामध्ये घट झाली.
गावकारभारी निवडण्यासाठी पुढाकार
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ३५ टक्के मतदानांनी पाठ फिरवली असली तरी गावकारभारी निवडण्यासाठी मतदारांनी पुढाकार घेतल्याचे या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावरून दिसून आले. १५ जानेवारीला झालेल्या मतदानामध्ये ग्रामपंचायतमध्ये ७६.२७ टक्के मतदान झाले.
लोकसभा (२०१९) ६३.५३ टक्के
(२०१४) ६१ टक्के
विधानसभा (२०१९) ६४ टक्के
(२०१४) ६५ टक्के