बुलडाणा : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची स्मृती जपण्यासाठी यावर्षीपासून राज्यात दरवर्षी पर्यावरण सप्ताह साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने २६ मे रोजी घेतला आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जनजागृती आणि वृक्ष लागवडीचा धडक कार्यक्रम या सप्ताहात राबविला जाणार आहे. दरवर्षी ३ ते ९ जून या कालावधीत हा सप्ताह संपूर्ण राज्यभर साजरा होईल. विशेष म्हणजे पर्यावरण सप्ताहाची ही संकल्पना बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे रुजवली गेली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री या नात्याने स्व. मुंडे यांनी देशाच्या व राज्याच्या विकासात भरीव योगदान दिले. त्यामुळे त्यांची आठवण कायम राहावी, यासाठीच लोकसहभागातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. ५ जून हा जगभर जागतिक पर्यावरण दिन म्हणून पाळला जातो. त्या दिवशी पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती आणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून हा सप्ताह साजरा होणार आहे. दरवर्षी या सप्ताहात होणार्या वृक्ष लागवडीचा जिल्हानिहाय आढावा शासन घेणार आहे. त्यामध्ये जलयुक्त शिवार मधील गावांची संख्या, पर्यावरण सप्ताह आयोजित केलेल्या गावांची संख्या, लागवड केलेल्या रोपांची संख्या, त्यासाठी झालेला खर्च आणि निर्मित मनुष्यदिन आदी बाबींचा समावेश आहे. या सप्ताहामध्ये म. गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत संपूर्ण राज्यात वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातील गावांना प्राधान्य देण्यात येणार आहे. सप्ताहातील कार्यक्रमांच्या संनियंत्रणाची जबाबदारी विभागीय आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.
राज्यात साजरा होणार पर्यावरण सप्ताह
By admin | Updated: May 29, 2015 00:25 IST