बुलडाणा : जिल्ह्यातील नगरपालीकांमध्ये नगराध्यक्ष पदासाठीचे राजकारण चांगलेच तापले असुन नगरसेवकांच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी आपली फिल्डींग लावण्यासाठी वरिष्ठांकडे लॉबींग सुरू केली असुन काही ठिकाणी नगरसेवक सहलीवर गेले असल्याची माहिती आहे. बुलडाणा, खामगाव व जळगाव जामोद या तिनही नगरपालीकेतील अभ्रद युती संपूष्टात येण्याची चिन्हे आहेत. आज बुलडाणा पालीकेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी नगसेवकांची बैठक झाली या बैठकीत नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा व उपाध्यक्ष काँग्रेसचा अशी तडजोड झाल्याची माहिती आहे. गेल्यावेळी शिवसेनेसोबत कॉग्रेसने केलेली तडजोड संपूष्टात आणत सेनेला सत्तेबाहेर ठेवल्या जाणार आहे त्यामुळे आता आमदार विजयराज शिंदे कुठली चाल खेळतात याकडे राजकीय वतरुळाचे लक्ष लागले आहे.
** नांदूर्यात आज वेगवान घडामोडी झाल्या.
शिवसेना, नगरविकास आघाडी व नांदुरा नवनिर्माण आघाडी यांनी निवडणुकीपूर्वी स्थापन केलेल्या आघाडीला एकवीस पैकी पंधरा जागांवर स्पष्ट कौल दिला होता. ठरल्याप्रमाणे सुशिलाताई नांदुरकर नगराध्यक्षा झाल्या व आघाडीत आता सविताताई राजेश एकडे यांचा क्लेम आहे. मात्र काँग्रेसच्या विधानसभा मतदारसंघाच्या नेत्यांनी वेगळेच गणीत मांडले होते हे गणित बिनसल्याने आज जिल्हास्तरावरील एका नेत्यासोबत चांगलीच हमरीतुमरी झाल्याची चर्चा दिवसभर राजकीय वतरुळात होती. येथे भाजपाच्या काही सदस्यांनी विरोधाचा झेंडा उभारला होता परंतु राजकारणात काहीही होऊ शकते या न्यायाने सध्या नगराध्यक्षपदासाठी चुरस वाढली आहे.
** बुलडाण्यात आघाडी झाली तर खामगावात होईल का?
खामगाव पालीकेत भाजपा-सेनेने राष्ट्रवादीला नगराध्यक्षपद देत काँग्रेसला सत्तेबाहरे ठेवले त्यामुळे येथील अभ्रद युतीचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. आगामी विधानसभा डोळयासमोर ठेवत बुलडाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चित्र आहे त्यामुळे बुलडाण्यात झाले ते खामगावातही कायम राहिले तर येथे आघाडीची सत्ता येऊ शकते. आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी नगराध्यक्षपदासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले असुन आघाडीचा चेंडू राष्ट्रवादीच्या कोर्टात आहे. दरम्यान याबाबत राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अँड.नाझेर काझी यांना विचारणा केली असता वरीष्ठांकडून जो निर्णय येईल तो मान्य केला जाईल अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे येथे काँग्रेस-राकॉ एकत्र आले तर नगराध्यक्ष आघाडीचा होऊ शकतो अन्यथा पुन्हा एकदा नगराध्यक्ष हा ईश्वर चिठ्ठीने निवडून येणार आहे.
** नगरसेवक सहलीवर
चिखली नगर परिषदेमध्ये पक्षीय बलानुसार नगराध्यक्ष हा काँग्रेसचाच होणार आहे. सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा देखील काँग्रेसलाच आहे. मात्र, निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसचे आठ नगरसेवक सहलीला निघून गेले आहेत. विरोधीपक्षाचे नेते काँग्रेसमध्ये फूट पाडून ४ नगरसेवक आपणाकडे ओढण्याच्या प्रयत्नात आहेत. नगराध्यक्षपदाचे काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी नगर परिषद उपाध्यक्ष दीपक देशमाने, माजी नगराध्यक्ष रवींद्र उर्फ पप्पुसेठ हरलालका, सौ.करुणाताई बोंद्रे, सौ.शोभा सवडतकर, सौ.उषाताई डुकरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची निवड करताना आ.राहुल बोंद्रे हे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच निर्णय घेतील.
** 15 ला निवडणूक ?
दोन वेळा जाहीर होऊनही थांबलेली नगराध्यक्षपदाची निवडणूक आता होऊ घातली आहे. या निवडणुकीचे पडघम प्रत्येक नगरपालिकेत वाजत असून निवडणुकीच्या तारखेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत प्रशासकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही निवडणूक 15 जुलै रोजी होण्याचे संकेत मिळाले आहे. अल्प सुचनेवर ही निवडणूक घोषित करण्यात येईल व नगरसेवकांना तसे कळविण्यात येईल. त्यानंतर प्रत्येक नगरपालिकेत नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ९ नगरपालिकांमध्ये प्रशासकांनी पदभार घेतला आहे. अध्यक्षांच्या निवडणुकीनंतर उपाध्यक्षांच्या निवडणुका होतील.