बुलडाणा : जामनेर डेपोच्या एका महिला वाहकाने प्रवासी दोन महिलांना बसचे तिकीट न देता लगेजचे तिकीट दिले; परंतु पुढच्याच थांब्यावर बसची तपासणी होत असतानाच आपल्या भ्रष्टाचाराचे बिंग फुटू नये, म्हणून सदर महिला वाहकाने तिकीट निरीक्षकाच्या हातातून तिकीट हिसकावून गिळले असल्याचा प्रकार ६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता मोताळा तालुक्यातील रोहिणखेड थांब्यावर घडला. यावेळी सदर महिला वाहकाने कारवाई केल्यास आत्महत्या करण्याची धमकी दिली. जळगाव जिल्ह्यातील जामनेर डेपोची एम.एच.-२0 बीएल-0९५६ या क्रमांकाची शेंदुर्णी ते बुलडाणा ही बस धामनगाव बढे मार्गे बुलडाण्याकडे येत होती. या बसवर एक महिला वाहक कार्यरत होती. या बसमध्ये धामनगाव बढे येथून रोहिणखेडला जाण्यासाठी दोन महिला प्रवासी बसल्या होत्या. धामनगाव बढे ते रोहिणखेड या अंतराचे तिकीट तेरा रुपये आहे; परंतु सदर महिला वाहकाने नियमानुसार प्रवासी महिलांना तिकीट न देता दोन रुपयाचे लगेजचे तिकीट दिले. त्या तिकिटाच्या मागे २६ रुपये असे लिहिले. रोहिणखेडला बस येताच त्या ठिकाणी बसेसची तपासणी करण्यासाठी विभागीय तिकीट निरीक्षक पवार व चव्हाण उपस्थित होते. यावेळी बसमधून प्रवासी उतरत असतानाच तिकीट निरीक्षकांनी तिकिटाची तपासणी सुरू केली. त्यावेळी दोन महिला प्रवाशांजवळ लगेजचे तिकीट आढळून आल्यामुळे ते त्यांनी ताब्यात घेतले. आता आपल्या भ्रष्टाचाराचे बिंग फुटून कारवाई होणार या भीतीपोटी सदर महिला वाहकाने ते तिकीट निरीक्षकाच्या हातातून हिसकावून तोंडात टाकले व गिळून घेतले. तसेच माझ्याविरुद्ध कारवाई केल्यास आत्महत्या करण्याची धमकी तिकीट निरीक्षकांना दिली. त्यानंतर तिकीट निरीक्षकांनी या घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन सदर बस धामनगाव बढे पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसमधील प्रवाशांनीसुद्धा तिकीट निरीक्षकास साथ देऊन सदर बस पोलीस ठाण्यात नेण्याची मागणी केली. यावेळी बस थांब्यावर प्रवाशासंह असंख्य ग्रामस्थांनी गर्दी केली होती; परंतु त्यानंतर तिकीट निरीक्षकांनी सदर महिला वाहकाविरुद्ध कुठली कारवाई केली, याची माहिती मिळू शकली नाही.
कारवाईच्या भीतीमुळे महिला वाहकाने तिकीट गिळले
By admin | Updated: April 8, 2015 01:55 IST