लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शहर आणि परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने मिशन-ओ-च्या माध्यमातून शहराच्या विविध भागात आॅगस्ट ते आॅक्टोंबर या तीन महिन्यांच्या कालावधीत लोकसहभागातून ७५० च्यावर वृक्ष लावण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने घाटपुरी रोड ते जगदंबा मंदिर परिसराला प्राधान्य देण्यात आले. लावण्यात आलेली जवळपास सर्वच झाडे पूर्णपणे जगली असल्याने मिशन ओ-२ आणि वृक्षप्रेमींचे प्रयत्न फळास आल्याचे दिसून येते.निसर्गातून घेतलेले आॅक्सीजन म्हणजे ओ-२ निसर्गाला परत करण्यासाठी खामगाव शहरात झाडे लावण्याची मोहिम उघडण्यात आली. या मोहिमेला पर्यावरण प्रेमींनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कृतीशील सहभागामुळे शहराच्या विविध भागात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये किसन नगर, वरणगावकर विद्यालय, नॅशनल हायस्कूल समोरील भाग, घाटपुरी रोड आणि खासगी कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच सजनपुरी समोरील काही भागांना प्राधान्य देण्यात आले. मिशन ओ-२ च्या सकारात्मक प्रयत्नांना शहरातील काही सामाजिक पदाधिकाऱ्यांनी तसेच दानदात्यांनी हातभार लावला. सामाजिक वनीकरण विभागाकडून झाडे देण्यात आली. तर दानशुरांनी ट्री-गार्डसाठी मदत केली. आता मिशन ओ-२ पदाधिकारी लावलेली सर्वच झाडे जगविण्यासाठी प्रकल्प संचालक डॉ. के.एस.थानवी यांच्या पुढाकारात परिश्रम घेत आहेत. बहुतांश झाडे जगल्याचे सामाजिक वनीकरणासह मिशन-ओ-२ च्या सदस्यांना समाधान असल्याचे दिसून येते. दरम्यान, खामगावमध्ये वृक्षसंवर्धनाला यामुळे आता प्राधान्य मिळत असून येत्या काळात त्याचे दृश्य परिणामही समोर येतील.
खामगावात ७५० झाडे जगविण्यासाठी अनोखी धडपड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 15:45 IST