बुलडाणा : देशातील राज्यस्थान, मध्य प्रदेश आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये कावळे, वन्य पक्षी व स्थलांतरित पक्षी यांच्यामध्ये एविन इन्फल्युएंझा अर्थात बर्ड फ्लू या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्याचे निदर्शनास आलेले आहे. बुलडाणा जिल्ह्यात अद्यापपर्यंत बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. तरी जनतेने एव्हिन इन्फल्युएंझा म्हणजे बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावासंबंधी भीती बाळगण्याचे कारण नसून काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या दालनात १२ जानेवारी रोजी याबाबत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी ते बोलत होते.
बैठकीला पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये जर कावळे किंवा पक्षी मृत अवस्थेमध्ये दिसल्यास तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांना कळवावे. परंतु बर्ड फ्लू रोगापासून मानवाच्या जीवितास कोणताही धोका नाही. नागरिकांनी कोंबड्यांचे मांस व अंडी शिजवूनच खावी, असे आवाहन या वेळी डॉ. पी.जी. बोरकर यांनी केले आहे.