उद्धव फंगाळ - मेहकरमेहकर तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही नियमानुसार परवानगी अथवा डिग्री नसताना हे बोगस डॉक्टर गोरगरीब रुग्णांवर उपचार करून त्यांच्या जीवाशी खेळत आहेत. हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरु असताना आरोग्य विभागाचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. मेहकर तालुक्यात जवळपास १४० खेडी असून, सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागात उष्माघात, लहान मुलांना गौर, काजण्या, ताप यांसह इतर आजाराने ग्रासले आहे. ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तथा उपकेंद्रात डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे गरीब रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाहीत, तर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी हे वेळेवर हजर राहून रुग्णांवर उपचार करीत नाहीत, त्यामुळे अशा गोरगरीब रुग्णांना खासगी दवाखान्यात जाऊन महागडा उपचार घ्यावा लागतो. परिणामी, शासनाने गरिबांसाठी ग्रामीण भागात सुरु केलेले सरकारी रुग्णालये ओस पडत आहेत. याचाच फायदा घेऊन पांगरखेड, जनुना, शेलगाव देशमुख, लाणी गवळी, मोळा, पिंप्रीमाळी, लावणा, शिवचंद्र मोळी, अंजनी बु., गोहोगाव दांदडे, भोसा, द्रुगबोरी, कळंबेश्वर, हिवरा खुर्द, मुंदेफळ, निंबा, लोणी काळे, बार्डा, वरवंड, घाटनांद्रा, गोमेधर, उटी, पार्डी, घुटी, सोनाटी, बोरी, उकळी-सुकळी, विश्वी, डोणगाव, आरेगाव, अंत्री देशमुख, चायगाव, देऊळगाव माळी, हिवराआश्रमसह परिसरामध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याचे दिसत आहे. शहरातील नामवंत डॉक्टरांच्या हाताखाली दोन ते ३ वर्ष कम्पाउंडरची नोकरी करून त्यानंतर हेच कम्पाउंडर ग्रामीण भागात जाऊन डॉक्टरी व्यवसाय करतात, तसेच काही डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेले मात्र नियमानुसार नसलेले बोगस प्रमाणपत्र घेऊन ग्रामीण भागात आपला डॉक्टरचा व्यवसाय करताना दिसून येत आहेत. या बोगस व्यवसायापासून आर्थिक कमाई होत असली, तरी अशा बेकायदेशीर उपचारामुळे गोरगरीब रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहरात जाऊन महागडा उपचार घेण्यापेक्षा जर गावातच कमी पैशात उपचार होत असल्याने अशिक्षित गोरगरीब गावातच उपचार घेतात; मात्र अनेक वेळा चुकीचा उपचार होऊन त्या रुग्णांवर विपरित परिणाम होतो व नंतर त्या रुग्णाला शहरात जाऊन महागड्या दवाखान्यात इलाज करावा लागतो. बोगस डॉक्टरांचा हा व्यवसाय जवळपास सर्वच खेडेगावात चालत आहे; परंतु त्या-त्या गावातील सरपंच, पोलीस पाटील व इतर लोकप्रतिनिधी काहीच बोलायला तयार नसतात. ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना आरोग्यांची चांगली सुविधा मिळावी, त्यांच्यावर वेळीच उपचार व्हावेत, यासाठी शासनाकडून ग्रामीण भागात सरकारी रुग्णालये सुरु करण्यात आली आहेत, तर त्या रुग्णालयांवर डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. या कर्मचाऱ्यांवर व रुग्णालयावर शासनाचे दरमहा लाखो रुपये खर्च होतात, तसेच कोट्यवधी रुपयांच्या औषधांचा पुरवठा केला जातो; मात्र याचा लाभ ग्रामीण रुग्णांना मिळत नाही. दुसरीकडे बोगस डॉक्टरचा व्यवसाय करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने तालुका स्तरावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविली आहे; परंतु मेहकर तालुक्यात ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा व्यवसाय सुरु असताना जिल्हा आरोग्य अधिकारी किंवा तालुका आरोग्य अधिकारी गप्प का आहेत. कारवाई का करीत नाहीत, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहेत. एखाद्या सरकारी डॉक्टरने लाच मागितली तर त्याच्यावर तत्काळ कारवाई होते; मात्र दिवसाढवळ्या डॉक्टरचा बोगस व्यवसाय सुरु असताना कारवाईच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे, त्यामुळे गोरगरिबांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई न करणाऱ्या सरकारी डॉक्टरांवर कारवाई कधी होणार, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.शहरातील नामवंत खासगी दवाखान्यामध्ये अशिक्षित कर्मचाऱ्यांचा भरणा४ सध्या मेहकर शहरामध्ये अनेक मोठ-मोठे खासगी रुग्णालय व मेटॅर्निटी होम आहेत. या रुग्णालयाच्या व्यवसायामध्ये जणू काही डॉक्टरांची स्पर्धाच लागली आहे. या खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिंवस वाढतच आहे. औरंगाबाद, अकोला, बुलडाणा, मुंबई येथे जाण्यापेक्षा मोठ्या आजारावर जर मेहकरमध्ये उपचार होत असतील तर रुग्ण येथेच उपचार घेण्यास इच्छुक असतात. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचा वेळ व पैशाची बचत होते; परंतु शहरातील काही हॉस्पिटल व दवाखान्यामध्ये अशिक्षित मुला-मुलींचा भरणा असल्याने रूग्णांना इंजक्शन देणे, सलाईन लावण्याचे काम हेच अशिक्षित मुलं, मुली करतात; मात्र याचा रुग्णावर बरेचदा विपरित परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. वैद्यकीय व्यवसायाचे कोणतेच ज्ञान नसलेले हे कर्मचारी रुग्णांच्या जिवाशी खेळतात. तुटपुंज्या पगारावर डॉक्टर मंडळीसुद्धा त्यांचा वापर करून घेतात. यामध्ये हॉस्पिटल व दवाखान्याचा फायदा होत असला, तरी रुग्णांसाठी हे धोकादायक आहे. त्यामुळे अशा दवाखान्याचीसुद्धा चौकशी करून अशा डॉक्टरांवर कारवाई होणे गरजेचे आहे.कायदा फक्त डॉक्टरांसाठीच का?उपचाराअभावी एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला आणि नातेवाइकांनी संतापाच्या भरात त्या डॉक्टरांना मारहाण केल्यास डॉक्टर संपाचे शस्त्र उगारतात, त्यातून संबंधित नातेवाइकांवर कारवाई होते; मात्र जिवानीशी गेलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांच्या मानसिकतेचा विचार होत नाही. सध्या मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरचा व्यवसाय सुरु आहे. हा सर्व प्रकार राजरोसपणे सुरु आहे; मात्र वर्षातून एखाद्या वेळेस थातूरमातूर कारवाई होते व त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे ’ सुरु राहते; परंतु ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरचा व्यवसाय सुरु असताना नियमानुसार चालणारी मेडिकल असोसिएशन तथा डॉक्टर आवाज का उठवीत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. १५ मार्च ते १५ एप्रिल पर्यंत ग्रामीण भागात तपासणी मोहीम सुरु आहे. तसेच ग्रामीण भागात जर कोणी वैद्यकीय परवाना नसताना बोगस डॉक्टर व्यवसाय करीत असेल व तशी तक्रार आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल.- महेंद्र सरपाते, तालुका आरोग्य अधिकारी,मेहकर.