जिल्हा समन्वयकपदी सरपंच सीमा काळुसे
सिंदखेड राजा : सरपंच परिषद, मुंबई महाराष्ट्र या परिषदेच्या बुलडाणा जिल्हा समन्वयकपदी सिंदखेड राजा तालुक्यातील किनगाव राजा ग्रामपंचायत सदस्या सीमा गजानन काळुसे यांची निवड करण्यात आली आहे. सीमा गजानन काळुसे यांच्या निवडीचे पत्र सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल गीते, महिला प्रदेश अध्यक्षा राणीताई पाटील, प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव यांनी दिले आहे.
मिरचीचे पीक बहरले
मेहकर : पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत शेतकरी आता आधुनिक शेतीकडे वळला आहे. शिवाजीनगर शिवारात शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व मल्चिंगचा वापर करून मिरची लागवड केली आहे. सध्या पीक बहरले आहे. मिरची उत्पादनातून शेतकरी माेठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत.
गोरेगाव ते उमनगाव रस्त्याची दुरवस्था
साखरखेर्डा : गोरेगाव ते उमनगाव रस्त्याची चाळणी झाली असून, मागील वर्षी अतिवृष्टीमुळे वाहून गेलेल्या पुलाचे कामही रखडले आहे. पहिल्याच पावसात पुलाची वाट लागण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाने याची दखल घेऊन काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
काेराेनाने १८ बालकांचा आधार हिरावला
बुलडाणा : काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूसंख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक गावांमध्ये कुटुंबच संपल्याचे चित्र आहे. काेराेना महामारीने बालकांनाही फटका बसला असून, जिल्ह्यातील १८ बालकांचा आधार हिरावला आहे. यामध्ये चार बालकांचे दाेन्ही पालक, तर १४ बालकांतील एका पालकाचे निधन झाले आहे.
कोरोना महामारीतही लाचखोरी सुरूच
बुलडाणा : गतवर्षीपासून काेराेनाचे संकट आल्याने अनेक जण आर्थिक संकटात सापडले आहेत. जगभरात काेराेना महामारीचे भीषण संकट असतानाही विविध विभागांत लाचखाेरी सुरू असल्याचे चित्र आकडेवारीवरून समाेर आले आहे. बुलडाणा जिल्ह्यात २०२० या वर्षात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १४ सापळे यशस्वी केले आहेत, तर २०२१ या वर्षातील पाच महिन्यांत ९ लाचखोरांना गजाआड करण्यात आले आहे.
बियाणे अनुदान वाढविण्याची मागणी
बुलडाणा : शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे देऊनही भाववाढीमुळे बियाणे खरेदी परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. शेतकरी सध्या अडचणीत असल्याने अनुदान वाढविण्याची मागणी होत आहे. आधीच शेतकरी संकटात सापडल्याचे चित्र आहे.
पाणंद रस्त्याच्या दुरुस्तीची गरज
किनगाव राजा : हिवरखेड ते बारलिंगा हा गावाकडील पाणंद रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची गरज आहे. बारलिंगा, खैरव, टाकरखेड येथून येणारे बरेच नागरिक या रस्त्याने ये-जा करतात. खरीप हंगामास अवघ्या काही दिवसांत सुरुवात हाेणार आहे. पाणंद रस्त्याची दुरवस्था झाल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
सिलिंडर घरपाेच देणाऱ्यांना लस द्या
बुलडाणा : काेराेना संसर्गामुळे प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांतही गॅस सिलिंडरचे घरपाेच वितरण सुरू आहे. मात्र, दुसरीकडे डिलिव्हरी बॉयला लसीकरणात प्राधान्य नसल्याने, कोरोना संसर्गाचा धोका नाकारता येत नाही. डिलिव्हरी बाॅयसह एजन्सीमधील कर्मचाऱ्यांनाही लस देण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
पशुखाद्याचे दर वाढल्याने शेतकरी त्रस्त
बुलडाणा : काेराेनामुळे गत वर्षापासून प्रशासनाकडून निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यामुळे पशुपालक आधीच संकटात आहेत. त्यातच पशूंचे खाद्य महागल्याने त्यांच्यावर आणखी एक संकट आले आहे. शासनाने पशुपालकांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.
कोरोनाने खचणाऱ्या रुग्णांसाठी जनजागृती
बुलडाणा : कोरोना आजाराने खचणाऱ्या रुग्णांसाठी वन्यजीव सोयरे यांनी जनजागृती करत चित्रफीत तयार करून ‘वाघ व्हा’ हा संदेश दिला आहे. सगळीकडे नकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, त्यांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे.