स्थानिक विठ्ठलनगरकडे जाणारा रोड अतिक्रमणाच्या विळख्यात अडकला आहे. सध्या मेहकर ते डोणगाव रोडच्या बाजूला नाली बांधकाम सुरू असल्यामुळे ठेकेदाराने पर्यायी रस्ता दिला होता; परंतु आता नालीचे व मेहकर ते डोणगाव रोडचे काम पूर्ण झाले असून, पर्यायी रस्ता बंद करून ले आऊटमधील मूळ सरकारी रस्ता चालू करून द्यावा, तसेच या मूळ रस्त्यावर ९ मार्च रोजी काही रहिवाशांनी मुरूम टाकून अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे. तो रस्ता खुला करून देण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली. विठ्ठलनगरमध्ये या रस्त्यावर पाच हॉस्पिटल असून, या हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांना या रस्त्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. या चुकीच्या पर्यायी रस्त्यावर अनेक अपघात होत आहेत. या रस्त्याच्या समस्येबाबत या अगोदरसुद्धा एमएसआरडीसी, नगरपालिका व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे; परंतु अजून काही कारवाई झाली नाही. त्यामुळे आता या रस्त्यावरील अतिक्रमण न हटविल्यास उपोषण करण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनावर डॉ. संतोष गावंडे, डॉ. संजय इंगळे, डॉ. अमित ताजणे, डॉ. राहुल चनखोरे, मनोज लोहिया, ललित रहाटे, दिलीप बाठिया, दीपक गायकवाड, शांतिलाल जैन, वैभव चनखोरे आदींच्या सह्या आहेत.
रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:03 IST