ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : जिल्हा पोलीस शिपाई पदाच्या ३६ जागेसाठी घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीनंतर १0 एप्रिल रोजी लेखी परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र सदर लेखी परीक्षा एक दिवस अगोदर म्हणजे ९ एप्रिल रोजी घेण्यात येत आहे. तसेच संकेतस्थळावर या परीक्षेसाठी प्रवेशपत्रही उपलब्ध नाही. त्यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला आहे. बुलडाणा जिल्हा पोलिस दलातील ३६ रिक्त जागांकरिता पोलिस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेस २२ मार्च रोजी पोलीस मुख्यालय परिसर, बुलडाणा येथे सुरूवात झाली. मैदानी चाचणीच्या वेळी परीक्षार्थींना पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा १0 एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते. मात्र ही लेखी परीक्षा १0 एप्रिल रोजी न घेता ९ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता घेण्यात येणार आहे. तारखेत अचानक बदल करण्यात आल्यामुळे परीक्षार्थींमध्ये गोंधळ उडाला आहे. उमेदवारांनी ऑनलाइन अर्जात दिलेल्या मोबाइलवर परीक्षेच्या वेळेत झालेल्या बदलाबद्दल कळविण्यात आले असल्याचे अधिकारी म्हणतात; मात्र बहुतांश उमेदवारांना परीक्षेच्या वेळापत्रकातील बदलाची माहिती मिळालीच नाही. मैदानी चाचण्यांपूर्वी पुरविण्यात आलेल्या ओळखपत्राशिवाय लेखी परीक्षेस कुठल्याही उमेदवरास प्रवेश दिला जाणार नाही. - संजयकुमार बाविस्कर, पोलीस अधीक्षक, बुलडाणा
बुलडाण्यात पोलीस शिपाईपदाची लेखी परीक्षा एक दिवस आधीच !
By admin | Updated: April 9, 2017 00:06 IST