राजेश शेगोकार/ बुलडाणा घाटाखाली व घाटावर असा भौगोलिकदृष्ट्या विभागल्या गेलेल्या बुलडाणा जिल्ह्यात घाटावर खडकपूर्णा अन् घाटाखाली जिगाव हे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहेत. या दोन्ही प्रकल्पांना मिळालेली मान्यता, निधींची उपलब्धता अन् प्रत्यक्षात सुरू झालेल्या कामांच्या कालावधीचा आढावा घेतला तर प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईनेच सिंचनाचा बळी घेतल्याचे स्पष्ट होते. सिंचन प्रकल्पाच्या वाढलेल्या किमतींना प्रशासकीय दिरंगाई जबाबदार आहेच, त्यासोबतच याच लालफितशाहीमुळे जिल्ह्यातील प्रत्येक प्रकल्प हा किमान १0 वर्षे उशिराने सुरू झाला असून, जिगाव प्रकल्पाला मंगळवारी सुधारित मान्यता मिळून तो प्रकल्प आता पाच हजार कोटींच्या घरात गेला आहे. जिगाव व खडकपूर्णा या महत्त्वाकांक्षी मोठय़ा प्रकल्पांसोबतच मध्यम प्रकल्पांच्या नशिबीसुद्धा सरकारची दप्तर दिरंगाई आली असल्याने सिंचन व पाणीपुरवठय़ासाठी निर्माण केलेले प्रकल्प हे रखडल्या गेले. १ लाख १ हजार ८८ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या जिगाव प्रकल्पाला एकूण ४ वेळा सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्या व आता त्यामध्ये आणखी एका सुधारित प्रशासकीय मान्यतेची भर पडली. हा प्रकल्प १९९६ मध्ये मंजूर असतानाही १९९९ पर्यंत निधीच उपलब्ध झाला नाही, तर कालव्याऐवजी उपसा सिंचन योजना प्रस्तावित करण्यातही बराच कालव्यपय झाल्याने हा प्रकल्प रखडला, त्यातच या प्रकल्पांना तत्परतेने निधी खेचून आणण्यासाठी लागणारी राजकीय महत्त्वाकांक्षा कमी पडल्यानेच निधी उपलब्ध होण्याबाबत शासनाने टाळाटाळ केली, हे स्पष्टच होते. खडकपूर्णा नदीवर गारखेड गावाजवळ उभारण्यात आलेला हा प्रकल्प आता पुर्णत्वास आला असला तरी रखडलेल्या पुनर्वसनामुळे केवळ ४२ टक्के जलसाठा दरवर्षी ठेवावा लागतो, अशी स्थिती आहे. २0 हजार ७२0 हेक्टर सिंचनाची क्षमता असलेल्या या प्रकल्पाला बुडीत क्षेत्रातील लोकांनी तसेच मराठवाड्याच्या बेलदरी प्रकल्पातील पाणी अडविल्या गेल्याने या भागातील लोकांनी केलेल्या विरोधामुळेही हा प्रकल्प वाढला आहे. या प्रकल्पास १६ ऑगस्ट १९८९ मध्ये पहिली मान्यता मिळाली; मात्र १९९४-९५ च्या आर्थिक वर्षापर्यंत निधी उपलब्ध झाला नाही, तर सन २00३-0४ व सन २00४-0५ या वर्षात अपुरा निधी दिला आहे.
दप्तर दिरंगाईनेच वाढल्या सिंचन प्रकल्पांच्या किमती!
By admin | Updated: February 25, 2016 01:48 IST