चिखली : येथील अल्पवयीन मेहुणीवर सख्ख्या जावयाने धावत्या कारमध्ये अत्याचार केल्याची घटना १२ सप्टेंबर राेजी उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे़ या प्रकरणी चिखली पाेलिसांनी आराेपींच्या शाेधासाठी दाेन पथके गठित केली आहे़ या पथकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आराेपी जावयाचा पाेलीस शाेध घेत आहेत़
चिखली शहरातील एक १७ वर्षीय मुलीवर जालना येथील तिच्या सख्ख्या जावयाने अत्याचार केल्याची घटना २० ऑगस्ट रोजी एका कारमध्ये अत्याचार केला हाेता़ त्यानंतर आरोपीने जालना येथील आपल्या घरासमोर रात्री ३ वाजेच्या सुमारास पीडितेला सोडून देत तेथून पळ काढला. या कृत्यानंतर केव्हाही अटक होऊ शकते तसेच कुटुंबीयांच्या रोषाचाही सामना करावा लागू शकतो, याची कुणकुण लागल्याने आरोपी जावई व त्यास या कृत्यात मदत करणारा कारचालक घटनेच्या रात्रीपासून फरार झाले आहेत. त्यांच्या शाेधासाठी चिखली पाेलिसांनी दाेन पथके स्थापन केली आहेत़
२१ दिवसांनंतर प्रकरण आले समाेर
याप्रकरणी पीडितेने २३ ऑगस्ट रोजी चिखली पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी पोस्कोअंतर्गत अत्याचार, बलात्कारासह विविध कलमांन्वये आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे़ २३ दिवसांपासून आरोपी माेकाटच फिरत असल्याने पोलिसांसमोर या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.
ठाणेदारांनी प्रकरण घेतले गांभीर्याने
सख्ख्या जावयाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस येताच चिखली शहरात खळबळ उडाली आहे़ चिखली ठाण्यात नव्यानेच रुजू झालेले ठाणेदार अशाेक लांडे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तातडीने दाेन पथके तैनात केली आहे़ या पथकामध्ये लांडे यांचाही समावेश आहे़ ही पथके आराेपींचा कसाेशीने शाेध घेत आहेत़