सुहास वाघमारे / नांदुरा (जि. बुलडाणा): शासनाने १ ऑगस्टच्या संध्याकाळी परिपत्रक काढून ७ ऑगस्ट पर्यंत पिक विम्याला मुदतवाढ दिली. मात्र २ ऑगस्टचा रविवार असून सोमवार तीन ऑगस्टपासून सहा ऑगस्टपर्यंंत कर्मचारी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रक्रीयेत राहणार आहेत. त्यामुळे कर्मचार्यांना शेतकर्यांना उपलब्ध होवून प्रमाणपत्र देणे शक्य नाही. सदर मुदतवाढ फार्स ठरणार असल्याची चर्चा आहे. तथापि, शासनाने ३१ ऑगस्ट पर्यंत पिक विम्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी होत आहे.यावर्षी सुरवातीला जोरदार बरसणार्या पावसाने दडी मारल्याने काही भागात दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांवर ओढवले व काहीच्या तर अद्यापही पेरण्याच बाकी आहेत. त्यामुळे पिक विमा काढण्याची ३१ जुलैची मुदत झाल्यानंतरही शेतकरी पिक विमा काढूच शकले नाही. त्यामुळे पिक विम्याची मुदत वाढवून देण्याची मागणी शेतकर्यांची होती. आधी नकाराची भाषा बोलणार्या राज्य शासनाने १ ऑगस्टच्या संध्याकाळी कृषी विभागाचे अवर सचिव श.बा.पावसकर यांनी परिपत्रक काढून ७ ऑगस्ट पर्यंंत मुदत वाढ दिली आहे. या परिपत्रकात ज्या अटी दिल्या आहेत. त्यामध्ये मुद्दा क्रमांक एक नुसार पेरणी हि १ ते ७ ऑगस्ट दरम्यानचीच असल्यास सदर मुदतवाढ लागु होणार आहे.प्रत्यक्षात मागील आठ दिवसांपासून पेरण्या खोळंबल्याने कोणीही या कालावधीत पेरणी करने शक्य नाही. मुद्दा क्रमांक दोन नुसार शेतकर्यांनी पिक विमा प्रस्तावावर पिकाची स्थिती सर्वसाधरणपणे चांगली असल्याची करणे आवश्यक आहे. हे सुध्दा पेरण्या खोळंबल्याने शक्य नाही. मुद्दा क्रमांक तीन नुसार शेतकर्यांना सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र म्हणजेच तलाठी व कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक असून बॅकांनी ते सांभाळून ठेवण्याची सुचना आहे. पावसाने दडी मारल्याने व दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांवर ओढावले आहे. काही भागात आजही पेरण्या बाकी अशा परिस्थितीत राज्य शासनाने कर्जमाफी व दुबार पेरणीसाठी मदत देण्याची मागणी शेतकर्यांची होती; मात्र शासनाने शेतकर्यांना 'भोपळा' दिला.
पीक विमा मुदतवाढ ठरणार ‘फार्स’
By admin | Updated: August 3, 2015 01:35 IST