मुख्य रस्ते गेले खड्यात
बुलडाणा : पावसामुळे शहरातील आधीच खड्डे असलेल्या रस्त्यावर अजून खड्डे पडले आहेत. गणेशोत्सव असताना हे खड्डे बुजवणे आवश्यक होते. त्यातच पथदिवेही बंद असल्याने हे रस्ते चुकवत असताना नागरिकांची मोठी तारांबळ उडत आहे.
नाल्या तुंबल्याने डासांची उत्पत्ती
बुलडाणा : शहरातील अनेक भागात नाल्या तुंबल्याने डासांची निर्मीती हाेत आहे़ अनेक भागात स्वच्छता अभियान राबवण्यात येत नसल्याने नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे़ याकडे नगर पालिका प्रशासनाने लक्ष देऊन स्वच्छता अभियान राबवण्याची गरज आहे़
साेयाबीनचे भाव वाढल्याने दिलासा
मेहकर : नवीन साेयाबीनला १० हजारांपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे़ अनेक शेतकऱ्यांनी लवकरच येणाऱ्या साेयाबीनची पेरणी केली हाेती़ त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे नवीन साेयाबीन आले आहे़
प्राथमिक आराेग्य केंद्र वाऱ्यावर
बुलडाणा : चांडाेळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार रामभरोसे सुरू झाला आहे. यावरही कळस म्हणजे या आरोग्य केंद्रात अनेक शासकीय कर्मचारी कार्यरत असताना हे आरोग्य केंद्र रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी चालवत असल्याचे दिसून येत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे़
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी
मासरुळ : परिसरात गत काही दिवसांपासून हाेत असलेल्या संततधार पावसामुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़