खामगाव : शेताचा सातबारा उतारा व फेरफार दिल्याने बक्षीस म्हणून पाच हजार रुपये लाचेची मागणी करणार्या तलाठय़ाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील शेलोडी येथील शेतमालक पंढरी भगवान दांडगे यांच्याकडे शेलोडी येथील गट क्रमांक १४६ मधील 0.३२ आर शेताचा सातबारा व फेरफार दिल्याने तलाठी एस.टी. महाले यांनी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. उपरोक्त आशयाची तक्रार शेतमालक पंढरी दांडगे यांनी २ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी कार्यवाही केली असता तडजोडीअंती चार हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर रक्कम घरी किंवा तायडे नामक व्यक्तीकडे देण्याचे सांगितल्याचे निदर्शनास आले. यावरून तलाठी एस.टी. महाले विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७, १५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक महेश चिमटे व अपर पोलीस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक व्ही.आर. पाटील, एएसआय श्याम भांगे, पोहेकाँ रवींद्र लवंगे, पोना संजय शेळके, पोकाँ विजय वारुळे आदींनी केली.
लाच मागणा-या तलाठय़ाविरुद्ध गुन्हा
By admin | Updated: April 11, 2017 00:18 IST