बुलडाणा : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बनावट देशी दारूची विक्री करण्याच्या प्रयत्नास असलेल्या एकास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १३ जानेवारी राेजी अटक केली. पाेलिसांनी त्याच्याकडून १ लाख ५४ हजार १४० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी १५ जानेवारी राेजी मतदान हाेणार आहे. या निवडणुकीसाठी माेठ्या प्रमाणात दारूची विक्री हाेत आहे. बाेराखेडी पाेलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या तराडखेड येथील एक जण बनावट दारूची विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने धाड टाकून सुभाषसिंग दिवाणसिंग इंगळे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला. ९० मिलीचे बनावट देशी दारूचे २४ नग बॉक्स, ९० मिलीच्या १६२ रिकाम्या बॉटल, ९० मिलीच्या ११० रसायन भरलेल्या बाॅटल व इतर साहित्यासह दुचाकी असा १ लाख ५४ हजार १४० रुपयांचा ऐवज जप्त केला. आराेपीविरुद्ध बाेराखेडी पाेलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पाेलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बळीराम र. गीते, पोउनि. श्रौकांत जिंदमवार, पोहेकाॅ. श्रीकृष्ण चांदुरकर, पोना. गजानन आहेर, पोना. लक्ष्मण कटक, पोना. राजेंद्र क्षीरसागर, पोकॉ. गजानन गोरले. पोकाॅ. बैभब मगर, चालक एएसआय मिसाळ, चालक पोना. विजय मुंढे यांनी केली आहे.