आ. श्वेता महाले यांनी यानुषंगाने एका प्रसिद्धीपत्रक जारी केले असून याद्वारे बुलडाणा जिल्ह्यातील कोरोनाच्या संदर्भात जाहीर होणारी आकडेवारी मुद्दामहून कमी दाखविली जात असल्याने जिल्ह्याला कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मिळणाऱ्या सुविधा, साहित्य व निधी कमी मिळत आहे. यास जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भाने आ.महाले यांनी बुलडाणा जिल्ह्याची दररोजची आणि राज्याची दररोजची जाहीर झालेली आकडेवारीच पुराव्यादाखल सादर केलेली आहे. आ.महालेंनी पुराव्यादाखल सादर केलेल्या आकडेवारीवरून १६ एप्रिल २०२१ ला बुलडाणा जिल्ह्याची एकूण बाधित रुग्णसंख्या ४९ हजार ९९६ असताना राज्याकडे ३७ हजार १५४ रुग्णांचीच माहिती देण्यात आली आहे. बरे झालेल्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ४३ हजार ९९३ असताना राज्याला ३४ हजार ८० इतके रुग्ण बरे झाल्याची राज्य शासनाकडून निघालेल्या प्रसिद्धीपत्रातून दिसत आहे. १६ एप्रिलला जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्ण ५ हजार ९८१ व राज्याने २ हजार ७३७ इतकी अॅक्टिव्ह रुग्णसंख्या दाखविलेली आहे. अशीच तफावत दररोज दाखविण्यात येत आहे. तथापि जिल्ह्याकडून शासनाकडे दररोजची देण्यात येणारी आकडेवारीची माहिती चुकीची जात असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांना योग्य प्रकारे औषधी, ऑक्सिजन, तथा इतर आरोग्य सुविधा पाहिजे त्या तुलनेत मिळत नाही. त्यामुळे कोरोना रुग्णांवर योग्यवेळी आणि योग्य प्रकारे उपचार मिळत नाही, असा आरोप करण्यासह हा प्रकार म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार असून कदाचित आघाडी सरकारच्या सांगण्यावरूनच मुद्दामहून आकडेवारी कमी दाखविली तर जात नाही ना? असा प्रश्नसुद्धा आ.श्वेता महाले यांनी उपस्थित केला. या प्रकराची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. यापुढे असा प्रकार कदापि खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा देऊन माहिती दररोज अद्ययावत करण्याचे पत्रसुद्धा जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
कोरोनाच्या चुकीच्या आकडेवारीचा जिल्ह्याला फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:35 IST