बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना संसर्ग वाढत असून, उपचार घेणारे रुग्णही वाढले आहेत. जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी अशा ७० काेविड सेंटरमध्ये रुग्ण हाउसफुल्ल झाले आहेत. गत काही दिवसांपासून उन्हाचा पारा चढला आहे. अशा स्थितीत काही काेविड सेंटरमध्ये विशेषत: शाळा, वसतिगृहात स्थापन केलेल्यांमध्ये कूलर, जनरेटरची व्यवस्थाच नाही. त्यामुळे या काेविड सेंटरमधील रुग्ण घामाघूम हाेत असल्याचे चित्र आहे.
मेहकर येथील मुलींच्या वसतिगृहात असलेल्या काेविड सेंटरची पाहणी केली असता यामध्ये कूलर, जनरेटर नसल्याचे आढळले, तसेच काही खाेल्यांमधील पंखेही बंद असल्याने काेराेना रुग्ण घामाघूम हाेत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात ३३ शासकीय काेविड सेंटर उभारण्यात आले आहेत. रुग्णसंख्या वाढतच असल्याने सर्वच केंद्रे हाउसफुल्ल झाली आहेत, तसेच खासगी रुग्णांलयानांही काेविड सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात ३७ काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहेत. यापैकी जे काेविड सेंटर शाळा, वसतिगृहांमध्ये उभारण्यात आले आहेत तेथे कूलरच नव्हे तर काही पंखेही बंद असल्याचे चित्र आहे. त्यामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत.
एप्रिल तापला
जिल्ह्यात एप्रिल महिन्यात तापमान ३६ ते ४० अंशांवर गेले आहे. यामध्ये आणखी वाढ हाेण्याची शक्यता आहे.
मार्च महिन्यातही तापमान ३२ अंशांवरून जास्त वाढले हाेेते, तसेच शेवटच्या आठवड्यात ४० अंशांपेक्षा जास्त हाेते.
मे महिन्यात सर्वाधिक तापमानाची नाेंद हाेते. त्यामुळे तापमान वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनापेक्षा उकाड्याचाच त्रास
गत १० दिवसांपासून मेहकर येथील काेविड सेंटरमध्ये उपचार घेत आहे. मुलींच्या वसतिगृहात कूलर तर साेडा काही पंखेही सुरू नाहीत. सध्या तापमान वाढत असल्याने त्याचा त्रास हाेत आहे. प्रशासनाने याची दखल घेत काेविड सेंटरमध्ये कूलर लावण्याची गरज आहे.
एक रुग्ण
मेहकर येथील काेविड सेंटरमधील काही खाेल्यांमधील पंखेे बंद आहेत. सध्या तापमानात माेठी वाढ झाल्याने रुग्णांना काेराेनापेक्षा उकाड्याचाच त्रास जास्त हाेत असल्याचे चित्र आहे. लक्षणे साैम्य असल्याने काेराेनाचा त्रास फारसा जावणत नाही. मात्र, दिवसभर उकाड्याने जीव कासावीस हाेत आहे. प्रशासनाने कूलर देण्याची गरज आहे. -एक रुग्ण