बुलडाणा : जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांची राज्य रस्ते विकास महामंडळाच्या सहसंचालक पदावर बदली झाल्यामुळे या पदावर डॉ. विजय झाडे यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या पदाचा पदभार आज २६ नोव्हेंबर रोजी स्वीकारला. यावेळी जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांनी डॉ. विजय झाडे यांना पदाची सूत्रे दिली व जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीत बसविले. डॉ. विजय झाडे २00२ च्या बॅचचे पंजाब कॅडरमधील आएएस अधिकारी आहेत. त्यांचे वय ४९ वर्षे आहे. त्यांनी आतापयर्ंत पंजाबमध्ये विविध जिल्ह्यांत उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, पंजाब सरकारमध्ये अवर सचिव पदांवर काम केले आहे. ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील आहेत. त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कृषी स्नातक पदवी प्राप्त केली आहे, तसेच कृषी विषयातच स्नातकोतर पदवीही मिळविली असून, पीएच. डी. केली आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अर्थशास्त्र विषयातील पदविकाही उत्तीर्ण केली आहे. त्यांनी पंजाबमधील घुमान येथे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची यशस्वी जबाबदारीही पार पडली आहे. डॉ. विजय झाडे यांनी पदाची सूत्रे स्वीकारत माजी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांना पुढील जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी झाडे यांनी स्वीकारला पदभार
By admin | Updated: November 27, 2015 01:43 IST