मेहकर (बुलडाणा) : सध्या शहरामध्ये चोरट्यांनी गेल्या आठवडाभरापासून धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मेहकरवासी भयभीत झाले आहेत. चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी मेहकर पोलिसांकडून कोणतीही ठोस पावले उचलल्या जात नसल्याने पोलिसांवर विसंबून न राहता आता नागरिकांनीच आपापल्या परिसरामध्ये रात्रीची गस्त घालणे सुरु केले आहे. पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.मागील आठवड्यामध्ये शिवाजी नगरमधील शिक्षक राजु बळीराम उगले हे घरी नसतांना दिवसा चोरट्यांनी घरात घुसून १ लाख ८६ हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेला. तर शिक्षक कॉलनीमधील सुनिल सिताराम सावळे यांचे घरात घुसून २७ नोव्हेंबर रोजी १७ हजार रुपयांचा माल चोरुन नेला. तसेच २९ नोव्हेंबरचे पहाटे डोणगाव रोडवरील खा.प्रतापराव जाधव यांचे भाऊ माधवराव जाधव यांचे घर फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला होता. या पसिरामध्ये गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी हैदोस घातला आहे. परिणामी नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरांच्या भितीने लोक बाहेरगावी जाणे टाळत आहेत. पोलिसांवर विसंबुन न राहता लोकांनी आपापल्या परिसरामध्ये ५ ते ६ जणांचा गट तयार करुन रात्री १ ते ५ वाजतापर्यंत स्वत: आपल्या भागात गस्त घालत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी याकडे लक्ष देऊन काहीतरी उपाययोजना करावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
नागरिक घालतात रात्रीची गस्त
By admin | Updated: November 30, 2014 23:18 IST