लोणार : पर्यटनदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरलेल्या मात्र विकासात तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या लोणार सरोवराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ५ फेब्रुवारीला लोणार येथे येणार आहेत. या दौऱ्यानिमित्त लोणार सरोवरासंदर्भात मोठी घोषणा होणार असल्याचे संकेत मिळत आहे. त्यामुळे लोणार सरोवरास आणखी महत्त्व येण्याची आशा लोणारवासी करीत आहेत.
लोणार सरोवर हे जगप्रसिद्ध असून, या सरोवराचा विकास अद्याप झालेला नाही. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा लोणार सरोवर दौरा जाहीर झाल्याने प्रत्येकाच्या भुवया उंचवल्या आहे. लोणार सरोवराचा सर्वांगीण विकास होऊन या ठिकाणी देशी व विदेशी पर्यटकाची मांदीयाळी वाढावी, या दृष्टीने हा दौरा अपेक्षित असून, ५ फेब्रुवारी, २०२१ रोजी मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री लोणार सरोवरास भेट देऊन लोणार सरोवराचा विकास आढावा बैठक घेणार आहेत. याबाबत अधिकृत दौरा असल्याने महसूल विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन्यजीव अभारण्य विभागाकडून, पोलीस यंत्रणेने हेलीपॅडसाठी जागेची पाहणी केली. हेलीपॅड तयार करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. मुख्यमंत्री व पर्यटनमंत्री यांच्या लोणार दाैऱ्यामुळे सर्वच विभागाची धावपळ सुरू झाली आहे. यामध्ये लोणारवासीयांना सुखद धक्का बसला असून, मुख्यंमत्री व पर्यटनमंत्री लोणार सरोवरासंदर्भात मोठा निर्णय करण्याची आशा लोणारवासीयांना वाटत आहेत. मुख्यमंत्री येणार असल्याने लाेणार शहरातील रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत आहे.