मोताळा (बुलडाणा) : मलकापूर मार्गावरील वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रामध्ये तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी खरबडी येथील सात शेतकर्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही तोडफोड ८ ऑक्टोबर रोजी झाली होती.खरबडी परिसरातील शेतकरी रोहित्रावरून होत असलेल्या कमी दाबाच्या वीजपुरवठय़ाने त्रस्त झाले आहेत. विहिरींना भरपूर पाणी आहे. मात्र, नवीन रोहित्राअभावी शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाहीत. त्यांना डोळ्यांदेखत पिकांची हानी पाहावी लागत आहे. महावितरणला अनेकदा तक्रारी देऊनही दुरुस्ती झाली नाही. कर्मचार्यांच्या अशा अडेलतट्टू धोरणाला कंटाळलेल्या खरबडी येथील शेतकर्यांनी ८ ऑक्टोबर रोजी आपला उद्रेक व्यक्त केला. संतप्त शेतकर्यांनी सकाळी मलकापूर रोडवरील महावितरण उपकेंद्रावर धडक दिली. यावेळी कर्मचार्यांच्या उत्तराने शेतकर्यांचे समाधान न झाल्याने कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली.
*आश्वासन न पाळल्याने शेतकरी संतप्तदोन नवीन डी.पी.ची मागणी पूर्ण करण्यात आली नाही. कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्यामुळे शेतकर्यांनी अनेकदा निवेदने दिली. त्यांची दखल घेण्यात आली नसल्याने शेतकर्यांचा संताप उफाळला. त्यांनी महावितरणच्या कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली.