भारतीय जनता पक्षाची पत्रपरिषदेत मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा : स्थानिक नगरपालिकेच्या सभागृहात स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान बहुमत असलेल्या गटनेत्याला मान्यता न देता पूर्वीच्या गटनेत्याला ग्राह्य धरून नियमबाह्य पद्धतीने झालेली निवडणूक प्रक्रिया रद्द करावी, तसेच संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी भाजपच्या गटनेत्या शारदा जायभाये यांनी पत्रपरिषदेत केली.
नगराध्यक्ष सुनीता शिंदे यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी घेतलेल्या पत्रपरिषदेत भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. रामदास शिंदे, तालुकाध्यक्ष विठोबा मुंढे, शहराध्यक्ष प्रवीण धन्नावत, भाजप गटनेते शारदा जायभाये, नगरसेविका पल्लवी वाजपे, मल्हार वाजपे, मालनबी, सुधाकर जायभाये, सलीम खान, निशिकांत भावसार, शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे आदींची उपस्थिती होती. गुरुवारी नगरपालिकेच्या सभागृहात भाजपच्या नगरसेवकांनी बहुमताने शारदा जायभाये यांना गटनेतापदी निवडले होते. तत्पूर्वी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना १९ जानेवारी रोजी एका पत्राद्वारे नवीन गटनेता निवडीसंदर्भात पत्र देऊन अवगत केले होते, तसेच जिल्हाधिकारी बुलडाणा यांनाही एका पत्राद्वारे अवगत करण्यात आले होते, अशी माहिती पत्रकार परिषदेत शारदा जायभाये यांनी दिली. दरम्यान, पालिका मुख्याधिकाऱ्यांनी भाजपच्या पूर्वीच्या गटनेत्या विमल माळोदे व नव्याने निवडण्यात आलेल्या भाजपच्या गटनेत्या जायभाये यांच्यात गटनेता म्हणून कुणाला मान्यता द्यायची आहे, याबाबत मार्गदर्शन मागितले. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत कुठलेही पत्र पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले नाही, स्थायी समितीच्या निवडणुकीदरम्यान पीठासीन अधिकारी यांच्यासमोर जायभाये यांनी गटनेता पदावर दावा करीत बहुमत असलेले पत्र दिले. मात्र, त्यांना गटनेता म्हणून सभागृहात मान्यता दिली नाही, असा आरोप करीत शारदा जायभाये यांनी गुरुवारी निवड झालेल्या नवनिर्वाचित सभापतीपदे रद्द करून नियमबाह्य पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. यावेळी भाजपच्या गटनेत्यांनी बुलडाणा नगरपरिषदेत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ऐन वेळेवर एकच गटनेता निवडला व येथील पीठासीन अधिकारीऱ्यांनी त्यांना मान्यता दिल्याचे पत्रपरिषदेत स्पष्ट केले.