बुलडाणा, दि. १६-जिल्हा परिषदेच्या ६0 गटासाठी व पंचायत समित्यांच्या १२0 जागांसाठी १ हजार ६९१ मतदान केंद्रांवर १६ फेब्रुवारी रोजी सरासरी ६६.६१ टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ३१७, तर पंचायत समितीच्या ५५७ उमेदवारांचे भाग्य सीलबंद झाले असून, २३ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. गुरुवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली. सकाळी पहिल्या टप्प्यात ९.३0 वाजेपर्यंत ७.६९ टक्के मतदान झाले. त्यानंतर ११.३0 वाजेपर्यंत १९.३0 टक्के, तर १.३0 वाजेपर्यंत ३४.१४ टक्के मतदान झाले. दुपारी ३.३0 पर्यंत ४९.३२ टक्के मतदान झाले. मेहकर तालुक्यातील डोमरूळ येथे सकाळी मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडल्याने एक ते दीड तास मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. तसेच सुलतानपूर येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार अपक्ष उमेदवार आशाताई झोरे यांनी केल्यामुळे सदर ईव्हीएम सील करण्यात आली. मेहकर तालुक्यातील मोळा व जवळा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. मतदान सर्वत्र शांततेत पार पडले असून, कुठेही आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मतदानाकरिता ६ हजार ७६४ कर्मचार्यांनी आपले कर्तव्य बजावले. संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याने काही काळ मतदान बंद होते. अध्र्या तासात मशीन दुरुस्त करण्यात आली. तसेच खामगाव तालुक्यातील घाटपुरी मतदान केंद्रावर बॅलेट युनिटमधील एका उमेदवाराच्या चिन्हाचे बटण दबत नसल्याने काही काळ गोंधळ उडाला; मात्र लगेच हे बॅलेट युनिट बदलवण्यात येऊन मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. घाटाखालील सहा तालुक्यांत सरासरी ५0 ते ६५ टक्के मतदान झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत ३0 ते ३५ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदारांचा ओघ वाढत जाऊन सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले. घाटाखालील खामगाव, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर आणि नांदुरा या तालुक्यांमध्ये मतदान शांततेत पार पडले. या सहा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या २५, तर पंचायत समितीच्या ५0 जागांसाठी ६४७ केंद्रांवर मतदान झाले. यामध्ये खामगाव तालुक्यात जि. प. च्या सात जागा, तर पंचायत समितीच्या १४ जागा आहेत. मलकापूर तालुक्यात जि.प.च्या तीन, तर पंचायत समितीच्या सहा जागा आहेत. नांदुरा तालुक्यात जि. प. च्या चार, तर पंचायत समितीच्या आठ, शेगाव तालुक्यामध्ये जि.प.च्या तीन, तर पंचायत समितीच्या सहा जागा, संग्रामपूर तालुक्यात जि.प.च्या चार, तर पंचायत समितीच्या आठ जागेसाठी आणि जळगाव जामोद तालुक्यात जि.प. च्या चार व पंचायत समितीच्या आठ जागांसाठी मतदान झाले. खामगाव तालुका ६९.३३ टक्के, शेगाव ७१.४0 टक्के, संग्रामपूर ४७ टक्के, जळगाव जामोद ७५ टक्के मतदान झाले.जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचे दौरे जिल्हाधिकारी विजय झाडे व पोलीस अधीक्षक संजीवकुमार बावीस्कर यांनी नांदुरा, मलकापूर व खामगाव येथे जाऊन मतदान कशाप्रकारे सुरू आहे, याची पाहणी केली. तसेच बंदोबस्ताचा आढावा घेतला.
बुलडाणा जिल्ह्यात ६६.६१ टक्के मतदान
By admin | Updated: February 17, 2017 01:39 IST