बुलडाणा : आरोग्य उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी करणार्या रुग्णालयांसाठी डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजना राबविण्यात येते, या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील खामगाव सामान्य रुग्णालय व बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून अर्ज दाखल झाले. पुरस्कारासाठी योग्यता पडताळणीसाठी योजनेच्या पथकाने आज ४ मार्च रोजी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाची झाडाझडती घेतली. यावेळी पथक प्रमुख सेवानवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.एस. एम.पावडे यांनी विचारलेल्या ह्यव्हाट इज बॉयोसेप्टीक प्रिकोशनह्ण या प्रश्नावर आरोग्य कर्मचार्यांचा गोंधळ उडाला. ग्रामीण आरोग्य व्यवस्थेचा कणा असलेले जिल्हा सामान्य रुग्णालयातील विविध समस्या नेहमी चर्चेत राहिल्या आहेत. त्याच रुग्णालय इमारत परिसरातील पडलेला बॉयोकचरा व अस्वच्छता यात आणखी भर टाकते. रुग्णालयातील ही अस्वच्छता आजच्या भेटी दरम्यान पुरस्कार पथकांच्या नजरेतून सुटली नाही. त्यामुळे प्रत्येक वार्डात गेल्यानंतर पथकाने कर्मचार्यांना व्हाट इज बॉयोसेप्टीक प्रिकोशन, हा एकच प्रश्न रेटून कर्मचार्यांना रुग्णालयातील अस्वच्छतेबाबत जाणीव करून दिली.डॉ.आनंदीबाई जोशी गौरव पुरस्कार योजना पथकातील विभागीय सदस्य सेवानवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ.एस. एम.पावडे, कुष्ठरोग अकोलाचे सहायक संचालक डॉ.पी.एल.माने, महिला पत्रकार अँड.नीलिमा शिंगणे, आरोग्य विभाग अकोलाचे सांख्यिकी अन्वेषक रमेश आ.मुळे यांच्या पथकाने आज जिल्हा सामान्य रुग्णालयाची झाडाझडती घेतली. दरम्यान, रुग्णालय कार्यप्रणाली, आरोग्य सुविधाची चाचपणी करून रुग्णालयातील त्रुटी लक्षात आणून देत, उपायही सुचविण्यात आले.
बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयाची झाडाझडती!
By admin | Updated: March 5, 2016 02:34 IST