राजेश निस्ताने - यवतमाळ अमरावतीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) पदावर वर्णी लावून घेण्यासाठी पदोन्नतीच्या प्रतीक्षेतील अनेक डेप्युटी आरटीओ प्रयत्नरत आहेत. त्यात बुलडाण्यातून जोरदार होत असलेल्या प्रयत्नांची अधिक चर्चा आहे. अमरावतीला श्रीपाद वाडेकर हे प्रादेशिक परिवहन अधिकारी होते. त्यांची नुकतीच नागपूर ग्रामीणला समकक्ष पदावर बदली झाली आहे. त्यांच्या या रिक्त जागेवर अनेक डेप्युटी आरटीओंचा पदोन्नतीच्या आडून डोळा आहे. अमरावतीशिवाय मुंबई पूर्व, मुंबई पश्चिम आणि परिवहन आयुक्तालयातील एक अशा आरटीओच्या चार जागा रिक्त आहेत. या जागांवर थेट समकक्ष अधिकाऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता कमी आहे. डेप्युटी आरटीओमधून पदोन्नती होणाऱ्या अधिकाऱ्यांमधूनच आरटीओच्या या रिक्त जागा भरल्या जाणार असल्याची माहिती आहे. लगेच पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या डेप्युटी आरटीओंची संख्या डझनावर आहे. त्यांना ही यादी जारी होण्याची प्रतीक्षा असली तरी ‘मॅट’मध्ये गेलेल्या एका प्रकरणामुळे ही यादी जारी व्हायला आणखी महिना लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावतीच्या आरटीओपदी वर्णी लावण्यासाठी नव्यानेच श्रीरामपूर (नगर) येथून बुलडाण्यात रुजू झालेल्या अधिकाऱ्याकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे सांगितले जाते. याशिवाय कोल्हापूर विभागातील एका अधिकाऱ्यानेसुद्धा दुसरा पर्याय म्हणून अमरावतीला पसंती दर्शविली आहे. या मोर्चेबांधणीत शासनाच्या परिक्षेत्रीय मर्यादेच्या जीआरचा अडसर तर ठरणार नाही ना, अशी हूरहूर या अधिकाऱ्यांमध्ये पहायला मिळते. यवतमाळवरही बुलडाण्यातून डोळाराज्यात उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची (डेप्युटी आरटीओ) पदेही मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. अमरावती विभागामध्ये यवतमाळ, अकोला येथे डेप्युटी आरटीओ नाहीत. यवतमाळात तर ‘एआरटीओ’ही नसल्याने आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती येथील डेप्युटी आरटीओ विजय काठोळे यांच्याकडे यवतमाळचा अतिरिक्त प्रभार आहे. त्यांच्याचकडे अमरावती आरटीओसह एकूण तीन प्रभार आहेत. यवतमाळला डेप्युटी आरटीओ म्हणून वर्णी लावून घेण्यासाठी बुलडाण्याच्या ‘एआरटीओ’कडून पदोन्नतीवर प्रयत्न सुरू असल्याचे समजते. डेप्युटी आरटीओच्या नुकत्याच बदल्या झाल्या. मात्र त्यात यवतमाळ व अकोल्याला कुणी आले नाही. तीन वर्ष पूर्ण झाले असताना चंद्रपूरच्या डेप्युटी आरटीओची बदली न झाल्याने प्रादेशिक परिवहन यंत्रणेमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.