बुलडाणा/खामगाव : जिल्ह्यात रविवार आणि सोमवारी विजेच्या कडकडाटासह झालेल्या वादळी वारा व गारपिटीने शेतातील रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले, तर अनेक गावांमध्ये वादळी वार्यामुळे घरावरील पत्रे उडाली. बुलडाणा तालुक्यातील धामणगाव धाड, मेहकर तालुक्यातील डोणगाव आणि लोणार तालुक्यातील वेणी येथे वीज पडण्याच्या घटना झाल्या. यामध्ये एक शेतकरी जखमी झाला असून, तीन गायी व एक वासरू ठार झाले. जळगाव जामोदसोबतच संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा, नांदुरा शहर परिसरात तसेच शेंबा बु. येथे काही काळ गारांसह पाऊस कोसळला. दरम्यान, रविवारी रात्री झालेल्या वादळामुळे झाडे उन्मळून पडल्याने सोमवारी बुलडाणा-चिखली आणि बुलडाणा बोथा मार्ग काही काळ बंद पडल्याने वाहतूक खोळंबली होती. रविवारी सायंकाळी झालेली गारपीट व वादळी पावसाचा गहू, हरभरा व भाजीपाल्यासह कांदा पिकाला मोठा फटका बसला. चिखली व बुलडाणा तालुक्यात तसेच शेंबा बु. व पातुर्डा परिसरात काही ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, सध्या शेतकर्यांचा गहू व हरभरा कापणीला आला असून, यावर्षी कांद्याचे पीक बर्यापैकी असून, या गारपिटीचा कांदा पिकाला तडाखा बसला. मागील दोन दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. यात रविवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात वादळी वार्यासह जोरदार गारपीट झाली. त्याचवेळी बुलडाणा शहरातसुद्धा ढगांच्या गडगडाटांसह काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. रविवारी रात्री लोणार तालुक्यात वेणी येथील दिलीप दौलत शेवाळे यांच्या जनावरांच्या गोठय़ावर वीज पडल्याने एक गाय व वासरू ठार झाले, तर डोणगाव येथे नामदेव पवार यांच्या घरावर वीज पडली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नाही, तर सोमवारी दुपारी धा.बढे येथे वीज पडल्याने एक शेतकरी जखमी झाला असून, दोन गायी ठार झाल्या. बुलडाणा तालुक्यातील सव, रूईखेड टेकाळे, येळगाव, शिरपूर, या गावामध्ये वादळी वार्यासह गारपीट झाल्याने घरावरील पत्रे उडाली. यामध्ये सर्वाधिक नुकसान रूईखेड टेकाळे, सव व येळगाव येथे झाल्याचे प्रशासनाने सांगितले.
बुलडाणा जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा!
By admin | Updated: March 1, 2016 01:27 IST