बुलडाणा : इसरूळ ता.चिखली येथे मागील वर्षभरात झालेल्या विविध विकास कामात प्रचंड अनियमितता झाली. त्याच्या तक्रारीही वरिष्ठांकडे झाल्या. अधिकार्यांनी अनियमितता झाल्याचे अहवालही दिले, मात्र दोषीवर अद्यापही कार्यवाही न झाल्यामुळे आमचा लोकशाही व स्वच्छ प्रशासनावरील विश्वास उडाल्याने येत्या १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणूकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय गावकर्यांनी घेतल्याचे एक निवेदन इसरूळ येथील नागरीकांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी किरण कुरुंदकर यांना दिले आहे. या गावकर्यांच्या म्हणण्यानुसार १३ वा वित्त आयोग, दलित वस्ती सुधार योजना आणि ग्रमापंचायतीच्या सामान्य निधितून आलेल्या पैशातील ४ लाख २९ हजार ५0२ रुपयाचा अपहार ग्राम सचिव व सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे. या कामाची तक्रार वरिष्ठांना दिली. यावर चौकशी होऊन चौकशी अहवालात दोशी सचिवावर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले. मात्र अद्याप प्रशासनाने संबंधीतावर कोणतीही कारवाई केली नाही. गावातील ७३ भुखंड सामाजिक उदिष्टासाठी ठेवण्यात आले होते.यातील दोन भुखंड ग्रामपंचायत सदस्य ओमप्रकाश भुतेकर आणि पुष्पाबाई भुतेकर यांनी बेकायदेशीरित्या स्वत:च्या नावाने करून घेतले. तर काही भुखंड परस्पर विकण्यात आले. तर ग्रा.पं.सदस्य पती मोहनसिंग वायाळ उपसरपंच पती गणेश भुतेकर यांनी १३ व्या वित्त आयोगातील ५४ हजार रुपयाच्या निधीचा अपहार केला. या प्रकरणाच्या अनेकवेळा तक्रारी केल्या मात्र चौकशी झाली नाही. तेव्हा शासकिय यंत्रणेवरील आमचा विश्वास उडाला असून आता निवडणूकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यासाठी गावकर्यांनी सह्याची मोहिम राबविली. यामध्ये २८२ कुटुंबांनी या प्रस्तावाला संमती दिल्याचे म्हटले आहे. निवेदनावर रंगनाथ भुतेकर, शे.हुसेन, दिलीप भुतेकर, संतोष भुतेकर यांच्यासह गावकर्यांच्या सह्या आहेत.
इसरूळच्या नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
By admin | Updated: September 25, 2014 01:14 IST