बुलडाणा : समाजकार्यात सदा अग्रेसर असलेल्या येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्थेने नेपाळमधील भूकंपग्रस्तांसाठी एकवीस हजारांचे सोलापुरी ब्लँकेट बुधवारी जिल्हाधिकार्यांमार्फत पाठविले आहेत.गेल्या एप्रिल महिन्यात आपल्या भारत देशाच्या शेजारी असलेल्या नेपाळमध्ये प्रचंड भूकंप झाला होता. या भूकंपामुळे मोठय़ा प्रमाणावर जीवित हानी व वित्तहानी झाली आहे. बरेचशे कुटुंब आपल्या रक्ताच्या नात्यापासून विभक्त झाली आहेत. या भूकंपामुळे नेपाळ देशाची आर्थिक स्थिती कोलमडून गेली आहे. या संकटातून नेपाळला बाहेर काढण्यासाठी संपूर्ण जगातून मदतीचा ओघ सुरू आहे. भूकंपग्रस्तांसाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटना, पतसंस्था, राजकीय पक्ष व दानशूर व्यक्तींनीसुद्धा मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुरुंदकर यांनी केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत नेपाळ भूकंपग्रस्तांच्या मदतीमध्ये आपलाही खारीचा वाटा असावा, या उदात्त हेतूने येथील सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्थेने सामाजिकतेची जाणीव ठेवून नेपाळच्या भूकंपग्रस्तांसाठी एकवीस हजारांच्या सोलापुरी ब्लँकेट अप्पर जिल्हाधिकारी टाकसाळे व निवासी उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे यांच्या उपस्थितीत शासन दरबारी जमा करण्यात आल्या आहेत. यावेळी संस्थेचे संचालक तथा जिल्हा परिषद सदस्य अँड. सुमित सरदार, सचिव बी.एस. गवई, उपाध्यक्ष एम.जे. बोर्डे, शिक्षक मेढे, सुरेश वानखेडे, अँड. नंदकिशोर साखरे, बाबासाहेब जाधव, मंगल हिवाळे, नितीन सावळे, मिलिंद जाधव, अरुण खोकले, विजय राऊत, विजय खंडागळे, देवानंद गोरे व शेख शफिक यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
भूकंपग्रस्तांसाठी पाठविले ब्लँकेट !
By admin | Updated: May 29, 2015 01:37 IST