मलकापूर : जिल्हा परिषदेच्या नरवेल-धरणगाव गटाच्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपाचे विलास हरिभाऊ पाटील यांनी राष्ट्रवादीच्या अश्विनी साठे यांचा ११६३ मतांनी पराभव करीत विजय मिळविला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या हक्काच्या जागेवर भाजपाने विजयाचा झेंडा रोवला आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या गटाचे जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सोपान साठे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. येथे १0 जानेवारीला ही पोटनिवडणूक झाली. मतदारांच्या निरुत्साहात पार पडलेल्या या निवडणुकीत सरासरी ४७.३0 टक्के मतदान झाले होते. गटातील ३५ मतदान केंद्रांवर या निवडणुकीत १२ हजार २५९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यामुळे विजयी होणारा उमेदवार अत्यल्प मतांनी विजयी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. तिहेरी लढत झालेल्या या गटात तब्बल एक हजार १६३ मते घेऊन भाजपाचे विलास हरिभाऊ पाटील विजयी झाले. त्यांना सहा हजार २१९ मते पडली. पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी साठे पुढे होत्या तर दुसर्या फेरीपासून भाजपाचे विलास पाटील यांनी आघाडी घेण्यास प्रारंभ केला. चौथी फेरी वगळता त्यांनी त्यांची आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी साठे यांचा एक हजार १६३ मतांनी पराभव केला. तिसरे उमेदवार नीना किसन किनगे यांना ७६३ मते मिळाली. विजयानंतर भाजपाच्या सर्मथकांनी जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. दिनेशचंद्र वानखेडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रवींद्र जोगी यांनी काम पाहिले.
नरवेल-धरणगाव गटावर भाजपाचा झेंडा
By admin | Updated: January 12, 2016 02:05 IST