बुलडाणा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणपती बाप्पांचे शुक्रवारी घराेघरी आगमन झाले. काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने निर्बंध गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याने भाविकांमध्ये माेठा उत्साह हाेता. त्यातच तिसरी लाट येणार नसल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. त्यामुळे, भाविकांचा उत्साह वाढला हाेता.
गतवर्षीपासून गणेश उत्सवावर काेराेनाचे सावट आहे. दुसरी लाट ओसरल्याने यावर्षी निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे, शुक्रवारी भाविकांमध्ये माेठ्या प्रमाणात उत्साह हाेता. आठवडी बाजारात गणेश मूर्तींच्या खरेदीसाठी भाविकांनी माेठी गर्दी केली हाेती. यावर्षी मूर्तीची उंची तसेच गणेश उत्सव मंडळांना आराेग्यविषयक उपक्रम राबवण्याचे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच काेराेनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. त्यामुळे, सार्वजिनक गणेश मंडळांचा उत्साह कमी झाला असला तरी भाविकांमध्ये मात्र माेठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला. बुलडाणा नगर परिषदसमाेर गणपती बाप्पांच्या मूर्तींची दुकाने सजली हाेती. भाविकांनी या मूर्ती खरेदीसाठी गर्दी केली हाेती.
पूजेच्या साहित्याची रेलचेल
पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, रानफळ, विद्युत माळ, सजावटीची फुले, केवड्याची पाने, कमळ, दुर्वा, तुळस, पत्री आदी साहित्याची दुकाने आठवडी बाजारात सजली हाेती. हे साहित्य खरेदीसाठी भाविकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली हाेती, तसेच प्रसादासाठी पेढे, मोदक, मावा, जिलेबी, लाडू यांचीही खरेदी करण्यात आली.
काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आवाहन
काेराेनाविषयक निर्बंधांमुळे यावर्षी सार्वजनिक मंडळांची संख्या यावर्षी कमी झाली आहे. जिल्ह्यातील २३३ गणेश मंडळांना प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात आली असली तरी निर्बंधाचे पालन करण्याची अट ठेवण्यात आली आहे, तसेच आराेग्यविषयक उपक्रम राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाजारात आले चैतन्य
काेराेनाचा फटका बसलेले व्यवसाय गत काही दिवसांपासून सावरत आहेत. त्यातच गणेशाेत्सवामुळे नवचैतन्य आले आहे. हे चैतन्य दहा दिवस राहणार आहे. तसेच काेराेनाची तिसरी लाट येऊच नये, यासाठी भाविक गणरायाला साकडे घालणार आहेत.