बुलढाणा : डोणगाव पोलिस ठाण्यात दाखल एका गुन्ह्यात आरोपीला शिक्षा होईल, अशा पद्धतीने न्यायालयात युक्तिवाद (बाजू मांडण्यासाठी) करण्यासाठी एक लाख रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या सहायक सरकारी अभियोक्ता जनार्धन मनोहर बोदडे (६१) यांना वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २८ फेब्रुवारी रोजी दुपारी अटक केली. त्यामुळे मेहकर परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी मेहकर येथील एका ५० वर्षीय व्यक्तीने वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपीला न्यायालयात शिक्षा होईल, अशा प्रकारे बाजू मांडण्यासाठी मेहकर न्यायालयातील सहायक सरकारी अभियोक्ता आणि सहायक सरकारी वकील जनार्धन मनोहर बोदडे यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली होती.
लाच द्यायची नसल्याने पीडित व्यक्तीने २४ फेब्रुवारी रोजी वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पडताळणीदरम्यान बोदडे यांनी पंचासमक्ष २ लाख ५० हजार रुपये मागितले होते. या प्रकरणात २८ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला आणि त्यात पंचासमक्ष एक लाख रुपये स्वीकारताना मेहकर न्यायालय परिसरात सहायक सरकारी अभियोक्ता आणि सहायक सरकारी वकील जनार्धन मनोहर बोदडे यांना वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
याप्रकरणी मेहकर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई अमरावती परीक्षेत्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलिस अधीक्षक सचिन्द्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक आणि प्रभारी पोलिस उपअधीक्षक बालाजी तिप्पलवाड, पोलिस हवालदार विनोद मार्कंडे, आसिफ शेख, योगेश खोटे, नायक पोलिस शिपाई रवींद्र घरत आणि मिलिंद चन्नकेशला व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
या कारवाईमुळे मेहकर परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या खासगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रभारी पोलिस अधीक्षक बालाजी तिप्पलवाड यांनी केले आहे.