पुणे - नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगावराजा ते बेराळा फाट्यापर्यंत चौपदरीकरणचे काम मागील दोन वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी हा रस्त्या अपूर्ण राहिलेला आहे. त्यातच दगडवाडी फाटा ते असोला जहागीर हा दोन किलोमीटरचा रस्ता वनविभागाने अडविल्याने गत काही वर्षांपासून चौपदरीकरणाचे काम रखडले आहे. एका बाजूने रस्ता खोदून ठेवल्याने मातीचे ढिगारे असून दुसऱ्या बाजूने रस्त्यावर मोठ-मोठे धोकादायक खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहन चालविणे कठीण झाल्याने या रस्त्यावर रोज अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत. अपघाताने अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. हा रस्त्या मृत्यूचा सापळा बनल्याचा अनुभव रोज वाहनधारकांना येत असून राष्ट्रीय महामार्ग व वन विभागाच्या अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने या मार्गाचे काम रखडले आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पुढाकार घेऊन अर्धवट राहिलेले रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा इशारा निवेदनाद्वारे राष्ट्रीय महामार्ग व वन विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
वन जमिनीतून गेलेल्या रस्त्याचे कामे मार्गी लावा ; अन्यथा आंदोलन -
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST