मलकापूर : शासनाने गोरगरीब नागरिकांना मोठय़ा आजारावर सवलतीच्या दरात उपचाराचा लाभ व्हावा, यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली; मात्र मलकापूर येथील एकाही खासगी दवाखान्याने ही योजना राबविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करून सहभागी होण्याची तयारी दर्शविली नसल्याचे वास्तव भाजपा प्रज्ञावंत सेलचे जिल्हाध्यक्ष नरेश देशपांडे यांच्या पाठ पुराव्यातून हा प्रकार समोर आला आहे.येथील भाजप प्रज्ञावंत सेलचे जिल्हाध्यक्ष नरेश देशपांडे यांनी शासनाशी केलेल्या पत्रव्यवहारात नमूद केले की, मलकापूर शहर व तालुक्याची लोकसंख्या मोठी आहे. त्यात प्रामुख्याने शेतमजूर तथा खासगी मजुरी करणार्यांचा समावेश आहे. महिलांचे ह्यसिझरह्ण असो पुरूषांच्या विविध आजारांवरील शस्त्रक्रिया, त्यासाठी रूग्णांना अकोला, जळगाव, औरंगाबाद, पुणे आदी ठिकाणी जावून महागड्या उ पचाराचा सामना करावा लागतो. परिणामी पैशांची जुळवाजुळव करताना जनसामान्यांची दमछाक होते. त्यासाठी लक्ष देण्याची विनंती देशपांडे यांनी उ पविभागीय अधिकार्यांमार्फत शासनाकडे केली होती. याबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजीव गांधी जीवनदायी योजना यांनी पाठविलेल्या पत्रामध्ये योजनेत सहभागी असलेल्या रूग्णालयांची माहिती दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ६ तालुक्यातील खासगी दवाखान्यांनी योजनेत ऑनलाईन सहभागी होण्याची तयारी दर्शविली; मात्र मलकापूर येथील एकाही खासगी दवाखान्याने या योजनेत ऑनलाईन अंगीकृत होण्याची तयारी दर्शविली नाही, अशी माहिती योजनेचे उपविभागीय अधिकारी यांनी पत्रात दिली आहे.त्यामुळे शासनाची योजना जरी जनसामान्यांसाठी असली तरी स्थानिक स्तरावरील खासगी दवाखान्यांच्या अनास्थेमुळे गरीब रूग्णांची फरफट होणार असल्याचे नरेश देशपांडे यांच्या पाठपुराव्यातून समोर आले आहे.
जीवनदायी योजनेंतर्गत सेवा देण्यास डॉक्टरांची अनास्था
By admin | Updated: November 20, 2014 23:39 IST