अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून धान्याची उचल न करणा-या तब्बल ७.९० लक्ष शिधापत्रिका शासनाच्या रडारवर आहेत. क्षेत्रीय स्तरावर तपासणी होईपर्यंत या शिधापत्रिका धान्य उचलण्यासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यात (एईपीओएस) प्रणालींतर्गत संगणकीकृत केलेल्या शिधापत्रिकेवरील लाभार्थींनी ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० या पाच महिन्यांच्या कालावधीत धान्याची उचल केलेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील ७ लक्ष ९५ हजार १६८ शिधापत्रिकांची क्षेत्रीय स्तरावर तपासणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या तपासणीअंती या शिधापत्रिकाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.
चौकट...
अपात्र, बोगस, अनिच्छुकचा बसणार शिक्का!
पाच महिन्यांपासून धान्याची उचल न करणा-या शिधापत्रिकांची क्षेत्रीय स्तरावर तपासणी केली जाणार आहे. यासाठी राज्यातील ७.९० लक्ष शिधापत्रिका संबंधित शिधावाटप निरीक्षकांच्या लॉगीनमध्ये वळत्या केल्या जातील. त्यानंतर अपात्र, बोगस, अनिच्छुक अशी शिधापत्रिकांची वर्गवारी केली जाईल.
चौकट...
ई-पॉसबाबत साशंकता!
राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आलेल्या ई-पॉस मशीनमध्ये अनेकदा तांत्रिक अडचण निर्माण होते. लाभार्थींचे थंब लागत नाही. २-जी नेटवर्क प्रणालीमुळे नेटवर्कचा खोळंबा निर्माण होतो. त्यामुळे आधार लिकिंग असतानाही लाभार्थी धान्यापासून वंचित राहतात. त्यामुळे शासन स्तरावर केल्या जाणा-या क्षेत्रीय स्तरावरील तपासणीबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.
चौकट...
पोर्टिबिलिटीसाठी तरतूद आवश्यक!
केंद्र आणि राज्य शासनाकडून ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या प्रणालीचा विचार केल्या जात आहे; मात्र पोर्टिबिलीटीसाठी खातरजमा न करताच प्रणाली अस्तित्वात आणल्या जात आहे. संबंधित रेशन दुकानदाराकडे धान्य शिल्लक आहे की नाही, त्याने मागील महिन्यात उचल न केलेल्या धान्याबाबत पारदर्शकतेची तरतूद असणे आवश्यक आहे.
---
चौकट...
अनेकांनी केली नाही धान्याची उचल!
मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यातील सर्वाधिक शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केलेली नाही. यामध्ये ठाणे १ लक्ष १५ हजार ९०४, वडाळा ८७ हजार १८२, पालघर ४२ हजार ०४, तर नाशिक जिल्ह्यातील ३६ हजार ८३७ शिधापत्रिकाधारकांनी गत पाच महिन्यांत धान्याची उचल केलेली नाही.
----
पश्चिम विदर्भात ४० हजार शिधापत्रिका
पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील ३९ हजार २२७ हजार शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केलेली नाही. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील १८ हजार १४३, अकोला जिल्ह्यातील १५ हजार ५०१ तर वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५८३ शिधापत्रिकांचा समावेश आहे.
------------