बुलडाणा : मागील काही दिवसांपासून येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राने शेतकऱ्यांना हवामान साक्षर करण्याचा वसा घेतला आहे. आतापर्यंत केंद्राने जिल्ह्यातील २१ हजार २३७ शेतकऱ्यांपर्यंत कृषी सल्ला पत्रिका पोहोचवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी संवेदनक्षम हवामान बदलाशी समरस होत असल्याचे दिसून येत आहेत.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व अकोला येथील कृषी विज्ञान केंद्रा अंतर्गत मागील दोन वर्षांपासून जिल्हा कृषी हवामान केंद्राने बुलडाणा जिल्ह्यातील २१ हजार २३७ शेतकऱ्यांपर्यंत आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका तालुकानिहाय व पीकनिहाय पोहोचविली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना येणाऱ्या पाच दिवसांच्या हवामान अंदाजानुसार शेतातील उभ्या पिकांमध्ये करावयाची कामे, फवारणी, कीडरोग व्यवस्थापन, ओलीत करणे, खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन, आंतरमशागत, पेरणीपद्धत, मुलस्थानी मृदा व जलसंवर्धन, माती परीक्षण, फळबाग व्यवस्थापन, कापणी व साठवणूक तसेच पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, शेळीपालन आदी संदर्भात कृषितज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तंत्रज्ञान योग्यवेळी पिकांची आवश्यकता लक्षात घेऊन पोहोचविले जाते. ज्यामुळे शेतकरी बांधव त्यांच्या शेतीचे अगदी सूक्ष्म व्यवस्थापन करू शकतात. याचा सकारात्मक परिणाम पीक उत्पादनात होऊन जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हवामान बदलाशी समरस होऊन शेती करताना दिसत आहे. जिल्ह्यातील एकूण एक शेतकरी संवेदनक्षम हवामान बदलाशी समरस व्हावा तसेच प्रत्येक शेतकऱ्याने हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिकेचा अवलंब करून हवामान साक्षर होऊन आपल्या शेतीला शाश्वततेकडे न्यावे, असे आवाहन कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी केले आहे.