नांदुरा : राज्यातील ग्रामसेवक आणि महसूल कर्मचार्यांचा संप मिटल्यानंतर, आता राज्यातील कृषी विभागातील विविध संवर्गातील अधिकारी व कर्मचार्यांचा आंदोलनाचा ताप शासनाला सहन करावा लागणार आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी या महत्वाच्या विभागाचे कर्मचारी ११ ऑगस्टपासून आंदोलन करणार आहेत. पुण्याच्या राज्य कृषी सेवा महासंघाने तेरा मागण्यांसाठी आंदोलनाचा बिगुल फुंकला आहे. वेतनश्रेणी व दर्जावाढीबाबत मंत्रीमंडळाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणे, कृषी विभागातील काही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करणे, नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत शेतकर्यांना नुकसान भरपाई देताना शासन निर्णयाप्रमाणे अंमलबजावणी करणे, कृषी कर्मचार्यांच्या मारहाणप्रकरणी अजामिनपात्र गुन्हा नोंदविणे, कमी केलेल्या कर्मचार्यांची सेवा नियमित करणे, कृषी पर्यवेक्षकांची पदे कृषी सहाय्यकातून भरणे, प्रवास भत्यात वाढ करणे, सेवकांची तीन वर्षाची सेवा ग्राह्य धरणे, आत्मा योजनेतील कर्मचार्यांना भत्ता लागू करणे, पेरणी अहवालाचे काम महसूल विभागाकडे सोपविणे, कृषी सहाय्यक संवर्गाचे पदनाम सहाय्यक कृषी अधिकारी असे करणे आणि सर्व पदांची भरती सरळ सेवा पद्धतीने करणे आदी मागण्या संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांसाठी ११ ऑगस्टपासून कृषी संवर्गातील कर्मचारी, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरणे आंदोलन करणार असून, १४ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. त्याच दिवशी काही कर्मचारी मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहेत, अशी माहिती राज्य कृषीसेवा महासंघ यांनी दिली आहे.
..आता आंदोलन कृषी कर्मचार्यांचे!
By admin | Updated: August 11, 2014 00:08 IST