चिखली : चिखली तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतीच्या निवडीसाठी १५ जानेवारीला सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे ७८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, तालुक्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. तथापि, मतदान यंत्राबाबतही कुठे समस्या उद्भवली नाही.
चिखली तालुक्यातील एकूण ६० ग्रामपंचायतींच्या २०२ प्रभागांमधील ५५८ जागांसाठी १५ जानेवारीला मतदानाची प्रक्रिया पार पडली. ५५८ जागांसाठी १ हजार ११८ उमेदवार या निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावत आहेत. यामध्ये एकूण ५५८ जागांपैकी १४३ उमेदवार यापूर्वी बिनविरोध निवडून आले असून, तालुक्यातील ६० पैकी ५ ग्रामपंचायती बिनविरोध झालेल्या आहेत. दरम्यान, १५ जानेवारी रोजी मतदानासाठी सकाळी साडेसात वाजल्यापासूनच ग्रामीण भागात मतदान केंद्रावर मतदारांना रांगा लागल्याचे पाहावयास मिळाले. सकाळी साडेनऊ ते दोनच्या सुमारास मतदानाचा वेग चांगला राहिला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सुमारे ६५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, तर सायंकाळी ४.४५ वाजेपर्यंत सुमारे ७८ टक्के मतदान झाले होते. तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींची एकूण मतदार संख्या ही १ लाख १३ हजार ५२७ इतकी असून, यामध्ये ५८ हजार ४४४ पुरुष, तर ५५ हजार ८३ महिला मतदारांचा समावेश आहे. दरम्यान, दिवसभर कुठेही कोणत्याही प्रकाराचा अनुचित प्रकार घडला नाही. तथापि, मतदान यंत्राच्या बिघाडीचीही समस्या कुठे उद्भवली नसल्याने तालुक्यातील सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. (तालुका प्रतिनिधी)
१९९ केंद्रांवरून पार पडले मतदान
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाद्वारे एकूण १९९ मतदान केंद्रावरून मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यासाठी तब्बल ८७६ कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. स्थानिक तालुका क्रीडा संकुलात मतदान व मतमोजणीसाठीची व्यवस्था संबंधित विभागाने केलेली आहे. या ठिकाणाहून ईव्हीएम व कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी रा. प. महामंडळाच्या २४ बसचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान, सर्वत्र मतदान प्रक्रिया पार पडण्यासाठी पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला. तहसीलदार अजितकुमार येळे याकडे विशेष लक्ष देत आहेत.