लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यात गत पाच वर्षांत ६० पैकी ५७ एचआयव्ही पाॅझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलांनी निगेटिव्ह बाळांना जन्म दिला आहे. पाॅझिटिव्ह असलेल्या गर्भवती महिलांनी काळजी घेतल्यास त्यांचे बाळ निगेटिव्ह जन्माला येण्याची शक्यता जास्त असते.
जिल्ह्यात आतापयर्यंत ३ हजार ९९८ एचआयव्ही पाॅझिटिव्ह रुग्ण आहेत. त्यात १९१ गर्भवती महिलांचा समावेश आहे. तसेच ३ हजार ८०७ सर्वसामान्य रुग्ण आहेत. एप्रिल ते ऑक्टाेबर २०२० दरम्यान ६४ एचआयव्हीबाधित रुग्ण आढळले. यादरम्यान ३६ हजार २३० नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसेच ३३ हजार ६९५ गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ५ गर्भवती महिला पाॅझिटिव्ह असल्याचे आढळले आहे. तसेच इतर रुग्णांची संख्या ५९ आहे. पाॅझिटिव्हिटीचा दर ०.१ टक्के आहे. तसेच जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटीचा दर ०.३ टक्के आहे. गेल्या दहा वर्षांत काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याचे चित्र आहे. २०१० मध्ये ५८३ एचआयव्ही पाॅझिटीव्ह आढळले हाेते.
गर्भवती महिलांनी पहिल्या तीन महिन्यांतच एचआयव्ही चाचणी करणे गरजेचे असते. लवकरच निदान झाल्यास त्वरित उपचार सुरू केल्याने बाळ निगेटिव्ह येण्याची शक्यता वाढते. तसेच बाळालाही औषधी देण्यात येते.
- प्रमाेद टाले, जिल्हा एड्स नियंत्रण अधिकारी, बुलडाणा
५ महिला आढळल्या एचआयव्ही पाॅझिटिव्ह
जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टाेबर दरम्यान पाच गर्भवती महिला एचआयव्ही पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत. जिल्ह्यातील ६९ हजार ९२५ लाेकांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ६४ जण पाॅझिटिव्ह आढळले हाेते.
गरोदर महिलांनी काय काळजी घ्यावी
गराेदर महिलांनी पहिल्या तीन महिन्यांतच एचआयव्ही तपासणी करून घ्यावी. अहवाल पाॅझिटिव्ह आल्यास त्वरित उपचार सुरू करावेत. तसेच बाळालाही औषधे द्यावीत. त्यामुळे धाेका कमी हाेताे.