बुलडाणा : विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून, मतदान केंद्र, येथील व्यवस्था आवश्यक ती गरज या सर्व बाबींची पूर्तता करताना मतदान केंद्रांची संवेदनशीलताही तपासली जात आहे. जिल्हय़ातील सात मतदार संघामध्ये १0८ मतदान केंद्र हे संवेदनशील तर २ मतदान केंद्र अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. या संख्येमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. विधानसभेच्या सात मतदार संघांपैकी सर्वाधिक १९ मतदान केंद्र हे संवेदनशील असणारा जळगाव जामोद हा मतदार संघ आहे. भौगोलिकदृष्ट्या तीन तालुक्यांमध्ये या म तदारसंघाचे विभाजन झाले असून, या मतदार संघात जळगाव शहरातील नगर परिषद शाळा क्र.१ मध्ये तीन बुथ जामोद येथील जिल्हा परिषद शाळेतील पाच बुथ तर पिं पळगाव काळे, टुनकी, सोनाळा येथील प्रत्येकी दोन बुथ संवेदनशील आहेत. शेगाव नगर परिषदेचे उर्दू शाळेमध्ये असलेले पाच बुथ हे संवेदनशील आहे. खामगाव शहरातील उर्दू शाळा, टिळक मैदान हे मतदान केंद्र अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहेत. खामगाव मतदार संघात ग्रामीण भागात १२ संवेदनशील मतदान केंद्र आहेत. तर खामगाव शहरातील जिजामाता जिल्हा परिषद शाळेमधील तीन तसेच सतीफैलमधील शिवाजी शाळेमधील पाच, अंजूमन मुलींच्या उर्दू शाळेत दोन मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. मलकापूरमध्ये गांधी चौकातील झेड.पी. उर्दू शाळा ही अतिसंवेदनशील मतदान केंद्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. तर या मतदार संघात एकूण १५ मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. बुलडाण्यामध्ये सहा, चिखली पाच, सिंदखेडराजामध्ये सात तर मेहकरमध्ये बारा मतदान केंद्र संवेदनशील आहेत.
१0८ मतदान केंद्र संवेदनशील
By admin | Updated: September 30, 2014 00:05 IST