६ जुलैला मतमोजणी उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला सुधारित कार्यक्रमभंडारा : भंडारा जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या कार्यक्रमात उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे या निवडणुका ३० जूनऐवजी ४ जुलै रोजी होणार असून ६ जुलै रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गतच्या १५ पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने ४ जून रोजी जाहीर केला होता. परंतु, भंडारा जिल्हा परिषद व सात पंचायत समितींच्या प्रभाग रचनेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील निर्णयाच्या अनुषंगाने प्रभाग रचनेची सुधारित अधिसूचना तयार करावी लागणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणूक कार्यक्रमात बदल करण्यात आलेला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या प्रभाग रचनेची सुधारित अधिसूचना १२ जून रोजी जाहीर होणार आहे. मुरमाडी (तुप) व पालांदूर जिल्हा परिषद गट व मेंढा (टोला) व किटाळी पंचायत समिती गणाच्या सुधारित मतदार याद्या १५ जून रोजी प्रसिद्ध केले जाणार आहेत. गोंदिया जिल्हा परिषद व त्याअंतर्गच्या पंचायत समितीच्या निवडणुका पूर्वघोषित कार्यक्रमानुसार होणार आहेत. गोंदियाची मतमोजणी २ जुलैला झाली आणि भंडाऱ्यात ४ जुलैला मतदान झाले तर त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित केला असता, या मुद्यांचे समर्थन करीत याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)असा निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम४सुधारीत कार्यक्रमानुसार, १६ ते २० जून या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दिली व स्वीकारली जातील. २२ जून रोजी नामनिर्देशनपत्रांची छानणी होईल व त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नामनिर्देशनपत्रासंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधीशांकडे २५ जूनपर्यंत अपील करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी २९ जून पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी तेथील निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. अपील असलेल्या ठिकाणी १ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील व त्याच दिवशी तिथेही निवडणूक रिंगणातील अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. मतदान केंद्रांची यादी २८ जून रोजी प्रसिद्ध केली जाईल. ४ जुलै रोजी सकाळी ७.३० ते ५.३० या वेळेत मतदान होईल. ६ जुलै रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक आता ४ जुलैला
By admin | Updated: June 12, 2015 01:12 IST