लाखांदूर : केंद्र शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षेचा नुकताच निकाल लागला असून, लाखांदूर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय लाखांदूर येथील तब्बल १६ विद्यार्थी या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले. या शाळेने तालुक्यात अव्वल येण्याचा मान पटकावला आहे.
केंद्र शासनामार्फत इयत्ता ८वीच्या विद्यार्थ्यांकरीता पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी असणाऱ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेत पात्र विद्यार्थ्यांना दरमहा हजार रुपये असे वार्षिक १२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. ही शिष्यवृत्ती सलग ४ वर्षे म्हणजेच पात्र विद्यार्थ्याच्या इयत्ता १२वीपर्यंत दिली जाते. सदरची परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची होत असून, यात एकाच दिवशी दोन पेपर घेतले जात असल्याची माहिती आहे.
या परीक्षेत लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयातील तब्बल १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात प्रगती हेमराज धोटे, धनश्री खुशाल मेंढे, प्रांजली यशवंत जांभुळकर, ऋचिता राजकुमार बुरडे, अनिकेत अमृत केळझरकर, क्रिस्ती भाग्यवान मोटघरे, पूजा सचिन सोनटक्के, साक्षी उमेश दिवठे, पल्लवी गिरीधर दिवठे, कुंजल शैलेश रामटेेके, निशांत नागेश्वर वकेकार, दुश्यंत शैलेश शिंगाडे, हसिना गौतम जांभूळकर, केतन देविदास उके, शुभांगिनी विश्वनाथ निमजे व पायल प्रदीप निमजे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांचे परीक्षा आवेदन भरल्यानंतर, येथील मुख्याध्यापक रवि मेश्राम यांच्या नेतृत्वात व विषय शिक्षकांच्या मार्गदर्शनात त्यांना संबंधित परीक्षेच्या अभासक्रमाची अद्ययावत माहिती देण्यात आली. त्यानंतर, जवळपास ३ महिने दर रविवारी सराव परीक्षा घेऊन, परीक्षा झाल्यानंतर त्यातील प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे सांगीतली जात असून, नियमित गृहपाठ व प्रत्येक विद्यार्थ्यांकडे व्यक्तिगत लक्ष दिले जात असल्याची माहिती यातील उत्तीर्ण विद्यार्थ्याने दिली.
विद्यार्थ्यांच्या यशस्वितेसाठी जि.प. हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक रवि मेश्राम यांच्या नेतृत्वात वर्गशिक्षक अरुण पारधी, चेतना वझाडे, विषय शिक्षक प्रतिभा पडोळे, प्रेमलाल गावडकर, नितीन पारधी, गोवर्धन वाघधरे, प्रमोद जांभुळकर, शुभांगी खोटेले, नितेश नाकतोडे व दीक्षा जनबंधू यांनी अथक परिश्रम घेतले.