नाना पटोले : मुद्रा बँक प्रचार साहित्याचे खासदारांच्या हस्ते विमोचनभंडारा : प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेचा जास्तीत जास्त प्रचार-प्रसार होवून खऱ्या गरजूंना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठी जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समितीच्या वतीने जनजागृतीचे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या प्रचार साहित्याचे विमोचन खासदार नाना पटोले यांच्याहस्ते जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या सभेत जिल्हा परिषद भंडारा करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर व जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते आदी उपस्थित होते. स्वयंरोजगार सुरु करु इच्छिणाऱ्या होतकरु युवकांसाठी प्रधानमंत्री मुद्रा बंक योजना अतिशय लाभदायी आहे. जुन्या व्यवसायीकांनाही योजनेअंतर्गत व्यवसायवाढीसाठी कर्ज उपलब्ध करुन दिल्या जाते. उद्योग सुरु करु इच्छिणाऱ्या तरुणांना प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करुन देण्याची योजना केंद्रसरकारने सुरु केली असून या योजनेमुळे उद्योजक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांचे स्वप्न साकार होणार असून जिल्हयातील जास्तीत जास्त तरुणांनी मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले. या योजनेअंतर्गत ५० हजार ते १० लाख रुपयापर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. ही योजना अधिकाधिक गरजू व होतकरु युवकांपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागाच्यावतीने जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हास्तरावर प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना प्रचार-प्रसार व समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्यावतीने जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या मुद्रा योजनेची सविस्तर माहिती असलेल्या जनजागृती फोमसीट व स्टीकर्सचे विमोचन करण्यात आले. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य विकास केंद्र, महाविद्यालय, तहसिल, पंचायत समिती व राष्ट्रीयकृत बँकांच्या ग्रामीण भागातील शाखामध्ये सदर जनजागृती साहित्य लावण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)
तरुणांनो, मुद्रा योजनेचा लाभ घ्या
By admin | Updated: March 21, 2017 00:31 IST