पालांदूर : कोरोना संकटकाळात समाजात भीतीचे वातावरण पसरले आहे. चुकीच्या विचाराने अनेक जण घाबरलेले आहेत. कोरोना भयावह असला, तरी आपल्या शरीरातील सकारात्मक शक्तीने कोरोनाला हरविण्याची किमया योग, प्राणायाम व ध्यान शक्तीमध्ये निश्चितच असल्याची प्रतिक्रिया पालांदूरच्या योग प्रशिक्षक कांचन हटवार यांनी दिली आहे. भारतीय धर्मशास्त्र, आरोग्यशास्त्र निश्चितच प्रेरणादायी आहेत. याचे महत्त्व पटवून देण्याकरिता पालांदूर येथील कांचन हटवार यांनी जिल्हा स्तरावर नि:शुल्क ऑनलाईन प्राणायाम, ध्यान असा उपक्रम सुरू केला आहे. अनेक जण या उपक्रमात सहभागी होत आहेत. कोरोना व्हायरस सध्या धोकादायक बनला आहे. साधा ताप, सर्दी, खोकला जाणवला, तरी कोरोनाची भीती वाटते. अशा कठीण प्रसंगी भारतीय शास्त्रीय अभ्यासाचा लाभ व्हावा, या हेतूने योग, प्राणायाम लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता ऑनलाईन उपक्रम सुरू केला आहे. यातूनच मनुष्याच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा तयार होऊन मानसिक बळ वाढण्याची शक्ती तयार होते. नकारात्मक विचारावर सकारात्मक विचाराने मात करता येते. प्राणायाम नियमित केल्याने शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कायम ठेवण्यास मोठी मदत मिळते. प्रत्येक व्यक्तीने दररोज ध्यान, योगासने, प्राणायाम करावा. त्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.
कोरोनाच्या संकटकाळात योग, प्राणायाम प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST