गत दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही धान खरेदी केंद्रावर धानाचे मोजमाप होत नाही, शेतकऱ्यांचे धानाचे चुकारे अडून पडले आहेत. केंद्रावर बारदानाचा अभाव तसेच केंद्रावरील ग्रेडरची हिटलरशाही व पणन अधिकार्यांचे दुर्लक्ष अशा या निष्काळजी शासनाच्या व विरोधी धोरणामुळे त्रस्त झालेल्या व पीककर्ज फेडण्यापासून वंचित राहणार का, हा प्रश्न पुढे ठेवूनच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी या रास्ता रोको आंदोलनाचे रणशिंग फुंकले होते.
दरम्यान, तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजू कारेमोरे व भंडाऱ्याचे डीएमओ गणेश खर्चे यांच्यासोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांच्या पुढे मांडल्या. त्यात त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे नायब तहसीलदार अशोक पाटील यांनी बारदान तातडीने पुरविण्यात येईल, पीककर्जाला मुदतवाढ देण्यात येईल, ३१ मार्चच्या आत शेतकऱ्यांना धानाचे चुकारे देण्यात येतील. केंद्रावर असलेल्या धानाचे मोजमाप ३१ मार्चच्या आत करण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यामुळेच आंदोलनकर्त्यांनी आपले आंदोलन स्थगित केले, तर सदर मागण्यांची पूर्तता झाली नाही तर आम्ही याच ठिकाणी पुन्हा आंदोलन उभारू, असा लेखी इशारा दिला आहे.
राजेश पटले यांच्या नेतृत्वात उभारण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात योगराज टेंभरे, अरविन पटले, डॉ. अशोक पटले, गोपाल येळे, सतीश चौधरी, मयूरध्वज गौतम, विनोद पटले, कालिदास कुंभारे, नंदू तुरकर, विकास बिसने, युवराज धुर्वे, मनोज पटले, नंदकिशोर टेंभरे, नितेश पटले, योगेश पारधी, रामदयाल भगत, महादेव ठाकरे, भूपेश पटले, रमेश उईके, प्रीतिलाल शिवणे, वनवास कावळे, रमेश खडसे, भक्तराज राणे तथा परिसरातील शेतकरी उपस्थित होते.