वरठी : जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली ही भारत सरकार मार्फत कार्यान्वित करण्यात येते. या प्रणाली अंतर्गत राज्यातील प्रत्येक शाळांची माहिती संकलीत करण्यात येते. शाळेत असलेले विद्यार्थी, शिक्षक, भौतिक सुविधा यासह शासनामार्फत देण्यात येणारे योजनेचा आराखडा या आधारावर निर्धारीत केला जातो. या करिता सर्व मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाने युडायस अंतर्गत अचुक व आवश्यक माहिती भरण्याचे आवाहन शिक्षण विस्तार अधिकारी विभावरी पडोळे यांनी केले. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदर् यांच्या निर्देशाप्रमाणे नेरी व मोहगाव केंद्राच्या संयुक्त मुख्याध्यापकांची कार्यशाळा नेरी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत घेण्यात आली. यात तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून विस्तार अधिकारी विभावरी पडोळे व मार्गदर्शक म्हणून नेरी केंद्राचे प्रमुख जयंत उपाध्ये व मोहगाव केंद्राचे डी.एस. डोकरीमारे यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला नेरी व मोहगाव केंद्राचे ५० मुख्याध्यापक उपस्थित होते.यावेळी विभावरी पडोळे यांनी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद यांच्या निर्देशानुसार जिल्हा शैक्षणिक माहिती प्रणाली अंतर्गत शालेय माहिती संगणकीकरण प्रपत्र भरण्यासंबंधात मार्गदर्शन केले. या दरम्यान मुख्याध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरे देवून त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आले. प्रपत्रात देण्यात आलेली संपूर्ण माहिती अचूक कशी भरता येईल याबाबतचे प्रपत्राचे व नियम पुस्तकाचे वाचन केंद्र प्रमुख जयंत उपाध्ये व डी.एस. डोकरीमारे यांनी केले. ‘यु डायल’ प्रपत्रात शाळा तपशील, शालेय इमारत, विद्यार्थी, योजनेचा लाभ, लाभार्थी परीक्षेचा निकाल, उपलब्ध शिक्षक, भौतिक सुविधा, पाणी पुरवठा, सुरक्षा साधने, पुनप्रवेश, खर्चाचा तपशील, शालेय खोल्यांची अवस्था, कर्मचाऱ्यांची मंजूर पदे व कार्यरत पदे, जाती व संवर्ग विकास विद्यार्थ्यांची यादी अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेत नवप्रभात हायस्कुलचे प्राचार्य अशोक गजभिये, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सीता गायधने, प्राथमिक शाळा वरठीचे मुख्याध्यापक फंदू धुर्वे, एकलारीचे मनोहर बालपांडे, अनिल गयगये, गोटेफोटे, रामरतन भुरे, युवराज राऊत, राजकुमार लिंगायत, अशोक चरडे, चचाचे उपस्थित होते. (वार्ताहर)
नेरी येथे मुख्याध्यापकांची कार्यशाळा
By admin | Updated: October 22, 2014 23:14 IST