मोरगाव येथील प्रकार : रोजगार सेवक व अभियंत्याचा कारभारलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : जवळील महालगाव-मोरगाव येथील जनतेच्या जागरूकतेमुळे येथे अधिकारी, पदाधिकारी यांनी कसा भ्रष्टाचार केला हा वाद आता चव्हाट्यावर येत आहे. येथे भ्रष्टाचाराने कळस घातल्याचे समोर येत आहे. राशन घोटाळा, बंधारा घोटाळ्यानंतर आता रोजगार हमी योजना घोटाळ्याची चर्चा असून मजूर कामावर गेलेले नसताना तसेच मस्टर तयार न करताच रस्त्यावर मुरूम टाकण्याच्या कामाचा नविनच प्रकार समोर आलेला आहे. या कामाचे देयके काढण्यात येवू नये, अशी मागणी उपसरपंच उमेश बुराडे, ग्रा.पं. सदस्य दुर्गा ढबाले, अशोक धारगावेसह अनेक गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.महालगाव-मोरगाव गट ग्रामपंचायतीतर्फे तेथे लाखो रूपयांचे रोहयो काम करण्यात आले. ज्या रस्त्याचे मातीकाम झालेले आहे त्या रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुद्धा केले जाते. मुरूम पसरविण्याचे काम मजुरा मार्फतच करावे, असे बंधन असताना पैशाच्या लालसेपोटी हे काम पावसाळ्यापुर्वी पूर्ण करण्याच्या नादात हजेरीपटाची मागणी न करता व हजेरीपट न भरता जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहायाने मुरूमाचे काम आटोपण्यात आले. ४ जून २०१७ पासून या मुरूम कामाला सुरवात करण्यात आली. याची तक्रार तहसिलदार, खंडविकास अधिकारी मोहाडी यांना करण्यात आल्यावर सहायक खंडविकास अधिकारी लांजेवार यांना या रस्त्याची चौकशी करण्यासाठी पाठविण्यात आले. ८ जून रोजी चौकशी अधिकारी लांजेवार यांनी चौकशी करून चौकशी अहवाल ११ जूनपर्यंत खंडविकास अधिकारी यांना सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. चौकशी अहवालानंतर दोषीवर काय कारवाई होते, याकडे महालगाव मोरगाव येथील जनतेचे लक्ष लागले आहे. इतर प्रकरणाप्रमाणे हे प्रकरणही घेवून देवून दडपण्यात येते की काय, असा संशय गावकऱ्यांना आहे.काम झाले नसल्याचा कांगावामातीकाम झालेल्या रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम झालेले आहे. हे काम झाले तेव्हा दुसरीकडे रोहयोचे काम सुरू होते. त्यामुळे या कामाचे मस्टर तयार करताच येत नव्हते, पण पावसाळा सुरू होण्याच्या भितीने मुरूम काम यंत्राद्वारे करण्यात आले. त्यानंतर मस्टर तयार केले गेले असते. या कामासाठी मुरूम खोदण्याची परवानगी तहसिल कार्यालयातून घेण्यात आली. २७२ ब्रास मुरूम २ जून ते १० जून पर्यंत काढणे व वाहतूक करणे, शासकीय गट क्रमांक ३७८ अशी परवानगी देण्यात आल्याची नोंद तहसिल कार्यालयात आहे. मात्र मस्टरच भरले गेले नसल्यामुळे हे काम झालेच नाही, असा पवित्रा आता रोजगार सेवक व अभियंत्यांनी घेतला आहे. मात्र उमेश बुराडे, अशोक धारगावे हे कारवाई करण्यावर ठाम आहेत.कामावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता मुरूम काम झाल्याचे आढळले,मात्र या कामाचे हजेरी पत्रक तयार करण्यात आलेले नाही. चौकशी अहवाल लवकरच सादर करणार आहे.-गजानन लांजेवार, सहा. गटविकास अधिकारी,मोहाडी.
मजुराविनाच झाले रोहयोचे काम
By admin | Updated: June 14, 2017 00:16 IST