२८ लोक १३ के
चंदन मोटघरे
लाखनी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लाखनी व मुरमाडी (सावरी) येथून जाणाऱ्या मार्गावर जेएमसी कंपनीद्वारे उड्डाण पुलाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. महामार्गाच्या मध्यभागी पिल्लर उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या पिल्लरला जोडण्याचे काम मोठ्या गतीने सुरू आहे. वाहतूक सुरु असते तसेच रस्त्यावर उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने अवजड वाहनांची वाहतूक सर्व्हिस रोडद्वारे सुरु केली जात असते.
येथील बाजार समितीच्या याॅर्डापासून ते केसलवाडा फाटा पर्यंतच्या बन्सी डेअरी पर्यंत उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. दोन्ही टोकाची स्कोप तयार करण्यात येत आहेत. तसेच लाखनी व मुरमाडीच्या क्षेत्रात येणाऱ्या नाल्यावर पुलाचे बांधकाम सुरू आहे. कंपनीने काम जोमाने सुरू केले परंतु लोकांच्या सुरक्षिततेची व्यवस्था केलेली नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अवजड वाहनांची वाहतूक सर्विस रोडणे होत असल्यामुळे सर्विस रोड पूर्णपणे उखडलेला आहे. लाखनीवासीयांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन सदर मार्गाने आवागमन करावे लागते.
केसलवाडा फाट्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे दिलीराम वाघाये यांना आपला जीव गमवावा लागला. लाखनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीनुसार भरधाव वेगाने येवुन धडक देणाऱ्या ट्रेलरच्या चालकाला दोषी मानले आहे तसेच जे एम सी कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरला दोषी मानले आहे. अपघातानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले. रस्ता वाहतुकीस योग्य असता तर अपघात घडला नसता. रहदारीच्या कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत
तसेच वाहतूक रक्षकांच्या अभावामुळे अपघाताच्या घटनांचे प्रसंग निर्माण होत आहेत.
ट्रॅफिक मार्शल्सची कमतरता
शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी जे एम सी कंपनीने मुरमाडी चौक, तहसील चौक, बाजार चौक, जयस्तंभ चौक, लाखोरी रोड चौक, मुख्य बसस्थानक येथे ट्रॅफिक मार्शल्स नेमणूक केली आहे. मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता बहुसंख्य ट्राफिक मार्शल्स कामावरून कमी केले आहे. त्यापैकी अनेक कामगार स्थानिक होते. ट्रॅफिक मार्शल्सची संख्या मोजकी आहे. प्रत्येक चौकात दोन्ही बाजूला वाहतूक कर्मचारी ठेवणे आवश्यक आहे. परंतु एका चौकात एकच वाहतूक कर्मचारी आहेत.
सुरक्षिततेचा अभाव
ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव आहे. कामाची पूर्वसूचना असणारे फलक लावलेले नसतात. केसलवाडा (फाटा) व पोलीस स्टेशन समोरील परिसरात जेथून उड्डाणपूल सुरू होतो व संपतो त्या ठिकाणी सुरक्षिततेची पुरेपुर अंमलबजावणी केलेली नाही.
सर्व्हिस रोडवर विक्रेत्यांचे अतिक्रमण
सर्विस रोड वरून वाहतूक सुरू असते. लाखनी व मुरमाडी हद्दीत येणाऱ्या मार्गावर फळवाले, भाजीपाला, कपडे, चप्पल, जनरल सामानाची दुकाने रस्त्यावर लावलेली आहेत. त्यामुळे वाहतूकीस अडचणी निर्माण होतात वेळोवेळी वाहतुकीचा खोळंबा होत असतो याकडे पोलिस विभाग व नगरपंचायतचे दुर्लक्ष झालेले आहे .