मंजुषा ठवकर यांचे प्रतिपादन : सिल्ली ग्रामपंचायतचा कार्यक्रमभंडारा : स्त्री-भ्रुणहत्येच्या प्रकारात वाढ झाली आहे. वंशाचा दिवा मिळावा यासाठी आईच्या उदरातच मुलींचा हकनाक बळी घेतले जात आहे. लेक वाचविण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भंडारा पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी मंजुषा ठवकर यांनी व्यक्त केले. तालुक्यातील सिल्ली ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला सरपंच दुलीचंद देशमुख, जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, संवर्ग विकास अधिकारी मंजुषा ठवकर, डॉ. कुंभरे, कारधा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश इंगोले, ग्रामविकास अधिकारी एस.टी. भाजीपाले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी ठवकर यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याकरिता नागरिकांनी पुढाकार घ्यावा. सोबतच गाव स्वच्छ व सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक ग्रामस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सर्वांच्या सहकार्याने गावाचा विकास शक्य होतो. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची जबाबदारी समजून यात सहभागी व्हावे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. नरेश डहारे यांनी मुलींचे जीवन सुखकर व्हावे यासाठी त्यांना उच्च शिक्षण द्यावे. मुलींकरिता शासनाने अनेक योजनांची अंमलबजावणी केली असून त्याचा लाभ पालकांनी घ्यावा असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमादरम्यान आदर्श कुटुंब, आदर्श जोडपे, आदर्श माता, आदर्श सुन, आदर्श लेक तथा गावातील ज्येष्ठ मार्गदर्शक महिलांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांवर होणारे अत्याचार, बालविकासाच्या योजना, महिला विषयक कायदे व आरोग्य विषयक कायदे केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरंपच दुलीचंद देशमुख यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन नलावडे यांनी केले. तर आभार ग्रामविकास अधिकारी एस.टी. भाजीपाले यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील महिलांसह परिसरातील पुरुष मंडळींची मोठी उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)
‘लेक’ वाचविण्यासाठी महिलांचा पुढाकार महत्त्वाचा
By admin | Updated: March 21, 2017 00:32 IST