मोहाडी : शैक्षणिक कार्याला वाहून घेणाऱ्या शिक्षकाचे अकस्मात निधन झाले. कर्ता पुरुष गेला. परिवाराची दैना झाली. अशातही हक्काची पेन्शन मिळावी यासाठी येरझाऱ्या मारणाऱ्या त्या शिक्षकांच्या पत्नीला खाबूगिरीमुळे वेदनाच मिळत आहेत.काटेबाम्हणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत विजय रामटेके यांचे सप्टेंबर महिन्यात निधन झाले. पतीच्या मृत्युमुळे उषा रामटेके यांच्यावर संकट कोसळले. परिवाराचा गाडा हाकण्यासाठी संपूर्ण जबाबदारी पत्नीवर आली. शासनाच्या धोरणानुसार पत्नीला निवृत्तीवेतन दिले जाते. पती गेल्याने दु:ख सोसणाऱ्या विधवेने पेन्शनसाठीचे सोपस्कार पूर्ण केले. भविष्य निर्वाहनिधी मिळण्यासाठी सर्व कागदपत्रे पंचायत समितीच्या शिक्षण विभागात जमा केले. परंतु, संवेदनहीन शिक्षण विभागातील कारकुनामुळे ती विधवा हतबल झाली आहे. सातत्याने सात महिन्यांपासून कार्यालयाची पायपीट करीत असणाऱ्या विधवेच्या हाती वेदनाच देण्यात आल्या आहेत. तेथील लिपीक काहीना काही कारण सांगून त्या शिक्षकांच्या पत्नीला घराची वाट दाखविली. मुलामुलींचे शिक्षण, पोटापाण्याचा प्रश्न सोसत असल्यामुळे त्या संतापल्या. त्यांनी उपसभापती उपेश बांते यांना गाठले. त्यांच्यासमोर आपबीती सांगितली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नावे निवेदन सादर केले. उषा रामटेके यांचे निवृत्तीवेतन मंजूरीसाठी सात महिने उशिर होत असेल तर त्यांनी जगायचे कसे? हा प्रश्न संत्रस्त करणारा आहे. पेन्शनशिवाय अनेक प्रकरण खाबूगिरीमुळे अडवून ठेवण्याचा व्यवसायच पंचायत समितीच्या शिक्षक विभागात झाला आहे.दप्तर दिरंगाईमुळे खंडविकास अधिकाऱ्यांनी संबंधित कारकुनावर शिस्तभंगाची कारवाई करावी. जाणीवपूर्वक अडवणूक करुन नाहक त्रास अनेक कर्मचाऱ्यांना होऊ नये, यासाठी त्यांचे स्थांनातरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पेन्शनसाठी महिलेची पायपीट
By admin | Updated: May 24, 2015 01:12 IST